माध्यमिक शिक्षक सोसायटीची सभा धक्काबुक्कीत गुंडाळली
सत्ताधारी -विरोधकांच्या प्रतिसभेत एकमेकांच्या विरोधात घोषणाबाजी
अहमदनगर : जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीची सभेत सत्ताधारी मंडाळाचे नेते प्रा . भाऊसाहेब कचरे यांच्या तज्ञ संचालक नियुक्तिवर आक्षेप घेत त्यांना बोलण्यात विरोधी संचालकांनी विरोध केला . यावरून सत्ताधारी -विरोधी मंडळाचे संचालक व कार्यकर्ते यांच्यात हमरी -तुमरी व घोषणाबाजी होऊन प्रचंड गदारोळ झाला . यामुळे अवघ्या पाच मिनिटातच सभेच्या कामकाजाचा गाशा गुंडाळण्यात आला . सभा संपली तरी सत्ताधारी व विरोधकांनी स्वतंत्र प्रतिसभा घेऊन घोषणाबाजी केली .
जिल्हयातील १२ हजार माध्यमिक शिक्षकांची आर्थिक कामधेनू असणाऱ्या जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीची ८० वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज ( मंगळवारी ) नगर शहरात अशोक ठुबे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती . सभा सुरू होण्याआधीच सत्ताधारी व विरोधकांनी फलक हातात घेत एकमेकांच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी सुरू केली. यानंतर सभेला सुरुवात झाली . प्रास्तावीक अध्यक्ष अशोक ठुबे यांनी करून संस्थेच्या आर्थिक प्रगतीचा लेखाजोखा सभासदांसमोर मांडला . सचिव स्वप्नील इथापे यांनी मागील इतिवृत्ताचे वाचन केले . यात विरोधी संचालक आप्पासाहेब शिंदे यांनी हस्तक्षेप करीत इतिवृत्तात काही मुद्दे जाणिवपूर्वक येत नसल्याची तक्रार केली . सभासदांनी विचारलेले सर्व प्रश्न इतिवृत्तात यायला हवे अशी त्यांनी मागणी केली . तसेच संस्थेच्या ऑडिटरची नेमणूक आताच करा संचालकांना तो अधिकार नको अशी मागणी त्यांनी लावुन धरली . तसेच शिंदे पुढे म्हणाले की , निवृत संचालकांना ( प्रा . कचरे यांना ) सभा चालवण्याचा अधिकार नाही , त्यांनी तसे केल्यास त्यास आमचा विरोध राहिल अशी भूमिका मांडताच अध्यक्ष ठुबे यांनी प्रा .कचरे हे संस्थेचे तज्ञ संचालक आहे . संस्थेच्या पोटनियमाप्रमाणे त्यांना बोलण्याचा अधिकार आहे असे स्पष्टिकरण दिले .
यावरून विरोधी संचालक शिंदे , बाबासाहेब बोडखे , महेंद्र हिंगे यांनी कचरे यांच्या बोलण्याला विरोध करताच सत्ताधारी संचालक आक्रमक झाले . दोन्ही गटातील संचालक व सभासधांमध्ये प्रचंड घोषणाबाजी सुरू झाली . काही सभासद व्यासपिठावर येऊन हमरी -तुमरीवर आले . माईकचा ताबा घेण्यासाठी धक्काबुक्की सुरू झाली . या अभूतपुर्व गोंधळात अवघ्या पाच मिनिटातच सर्व विषय मंजूर करून सभेचा गाशा गुंडाळण्यात आला .सभा संपल्यानंतर दोन्हीही गटाने स्वतंत्रपणे प्रतिसभा घेतल्या त्यात एकमेकांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली .