उद्धवजी, बाळासाहेब विचारतील तेव्हा तुम्ही काय उत्तर द्याल?

0
518

मुंबई: उद्धवजी, तुमचं आमचं नसेल जमत तर सोडून द्या, तुम्ही सरकार चालवताय. तुम्हाला सरकार लखलाभ असो. पण एक दिवस बाळासाहेबांना उत्तर द्यावं लागेल. मुंबईचे चिथडे चिथडे उडवणारा मंत्रिमंडळात होता तेव्हा तुम्ही काय केलं? असं बाळासाहेब विचारतील तेव्हा तुम्ही काय उत्तर द्याल? आम्ही सांगू नाही बाळसााहेब आम्ही संघर्ष केला. पण आपलेच सुपुत्र मुख्यमंत्री होते. सत्तेसाठी आंधळे झाले होते. ते त्यांचा राजीनामा घेऊ शकले नाही. राजीनामा मागितला तर सरकार जाईल अशी भीती त्यांना वाटत होती, असं आम्ही बाळासाहेबांना सांगू, असा घणाघातील हल्ला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. मलिक यांचा राजीनामा घेण्यासाठी भाजपने आज विराट मोर्चाचं आयोजन केलं होतं. यावेळी फडणवीस यांनी हा घणाघाती हल्ला चढवला.

अनिल देशमुखांचा राजीनामा घेता, संजय राठोडांचा राजीनामा घेता तर दाऊदच्या माणसाचा राजीनामा का नाही? हे सरकार दाऊदच्या इशाऱ्यावर चालतं का? तुम्ही कुणाच्या दाढ्या कुरवाळताय हे आम्हाला समजलं पाहिजे. नवाबचा राजीनामा का घेत नाही हे समजलं पाहिजे. तुम्ही राजीनामा घेतला नाही तर आम्ही संघर्श केल्याशिवाय राहणार नाही. आज मोर्चाची सुरुवात आहे, संघर्ष सुरूच राहील. मंत्र्याचा राजीनामा घेतल्याशिवया आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला.