कॉंग्रेसची भारत जोडो यात्रा मोदींचा लोकसभेला पराभव करेल!

0
462

आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा उमेदवारच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पराभव करेल, असा ठाम विश्वास काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला. राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ पदयात्रेचा परिणामी आगामी लोकसभा निवडणुकीत पाहायला मिळेल. त्याची परिणती पंतप्रधान मोदी यांची लोकसभा निवडणुकीत पराभव होण्यात होईल, असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. ते सोमवारी साताऱ्यातील काँग्रेस भवनात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ पदयात्रेसंदर्भात भाष्य केले. राहुल गांधी यांची ‘भारत जोडो’ पदयात्रा ७ नोव्हेंबरला नांदेड जिल्ह्यात येत आहे. ही पदयात्राच मोदींच्या पराभवाचे कारण ठरेल, असे चव्हाण यांनी म्हटले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार घालविण्यासाठी काँग्रेसलाच पुढाकार घ्यावा लागेल. त्यासाठी काँग्रेस सोडून गेलेल्यांना पुन्हा स्वगृही आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले. काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक २२ वर्षांनी पक्षाच्या घटनेनुसार झाली. मल्लिकार्जुन खरगे हे अध्यक्ष झाले असून, त्यामुळे काँग्रेसला उभारी मिळेल, असा विश्वास पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला.