शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे ई-मेलद्वारे मनपा आयुक्तांची तक्रार केली असून जनतेचे सुमारे ४ कोटी ३९ लाख रुपये खड्ड्यात घालण्याचा मनपाचा डाव असल्याचे निदर्शनास आणून देत लक्ष वेधले आहे. हा रस्ता शहराच्या आमदारांच्या घरापासून त्यांच्या कार्यालयाकडे जाणारा रस्ता आहे. ते दररोज या रस्त्यावरून ये-जा करत असतात. नगरकरांच्या पैशांची लूट होत असताना आमदारांची पण त्याला संमती आहे की काय असा सवाल काळे यांनी उपस्थीत केला आहे.
नुकतीच ३ मार्च रोजी महानगरपालिकेने टिळक रोड वरील पुणे एसटी स्टँड ते आनंदऋषीजी समाधीस्थळ पर्यंतचा रस्ता कॉंक्रिटीकरण करणे व दोन्ही बाजूने आरसीसी गटर करणे यासाठी सुमारे ४ कोटी ३९ लाख रुपयांची निविदा काढली आहे. प्रादेशिक पर्यटन विकास निधी २०२१-२०२२ अंतर्गत आलेल्या निधीतील सुमारे साडेचार कोटी रुपयांच्या निधीचा विनियोग गैरप्रकारे सुरू असल्याची तक्रार काँग्रेसने केली आहे.
निविदा काढण्यात आलेल्या या रस्त्याची काँग्रेसच्यावतीने आम्ही प्रत्यक्ष पाहणी केली असता सदर रस्ता आज सुस्थितीत असून केवळ किरकोळ डागडुजी, पॅचींग कामाची गरज असल्याच काँग्रेसने म्हटले आहे. सदर काम अत्यंत किरकोळ रकमेतून होऊ शकणारे आहे. असे असताना देखील जनतेचा पैसा खड्ड्यात घालण्याच्या हेतूने मनपाच्या वतीने चांगल्या रस्त्याच्या कामाचे टेंडरिंग करण्यात आले आहे. ही जनतेच्या पैशांची लूट आहे. आज रोजी सदर रस्त्याच्या असलेल्या चांगल्या स्थिती बाबतचे वस्तूस्थिती दर्शवणारे फोटो व मनपाने काढलेल्या निविदेची प्रतच किरण काळे यांनी मुख्यमंत्री, पर्यटन मंत्री यांच्यासह मनपा आयुक्त, मनपा शहर अभियंता यांना व प्रसारमाध्यमांना उपलब्ध करून दिले आहेत.
ही तक्रार करत असताना किरण काळे यांनी म्हटले आहे की, प्रादेशिक पर्यटन विकास निधीतून देण्यात आलेल्या निधीचा उपयोग पर्यटना ऐवजी जर रस्त्यासाठीच करायचा असेल तर शहरामधील शेकडो रस्ते आजही खड्ड्यांमध्ये आहेत. तर या निधीचा विनियोग योग्य ठिकाणी आवश्यकता असणाऱ्या रस्त्यांसाठी करण्यात यावा. त्याचबरोबर या निधीतून आनंदऋषीजी महाराज यांच्या समाधीस्थळाचा विकास करण्यात यावा. ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा यांनी म्हटले आहे की, आनंदऋषीजी महाराज यांचे जन्मस्थळ हे अहमदनगर जिल्ह्यातील आहे. नगर शहर, राज्य, देश व जगातील कोट्यवधी भाविक याठिकाणी वर्षभरामध्ये भेट देत असतात. त्यावेळी भाविक शहरातील अन्य पर्यटनस्थळांना देखिल भेटी देत असतात. त्यामुळे आनंदऋषीजी महाराज यांच्या समाधीस्थळाच्या विकासासाठी हा निधी खर्च करावा.
काळे यांनी याबाबत मनपावर गंभीर आरोप केले असून चांगल्या रस्त्यावर परत कोट्यावधी रकमेचे टेंडर काढून अत्यंत किरकोळ रक्कम खर्च करत रस्ता करायचा. त्या नावावरती कोट्यवधी रुपयांची बिले खतवायची आणि जनतेच्या पैशांवर दरोडा घालायचा. हा मनपा अधिकारी, पदाधिकारी, ठेकेदार यांचा डाव आहे.