धकाधकीच्या जीवनात विद्यार्थ्यांनी आनंद घेतला तरच आयुष्यात समाधानी राहताल – डॉ.दिपा मोहाळे
नगर – बदल होणे हा निसर्गाचा नियम आहे. आमच्या काळातील शिक्षण व आताच्या शिक्षण पद्धतीत आमुलाग्र बदल झाला आहे. आम्ही प्राथमिक-माध्यमिक शिक्षण अगदी हसत खेळत घेत होतो. कॉलेज जीवनात देखील शिकताना कधीच तणाव नसायचा आता मात्र बालवाडीपासूनच चिमुकल्यांवर पालक देखील अपेक्षांचे ओझे ठेवत असल्याने पुढे या अपेक्षा वाढतच जातात. धकाधकीच्या जीवनात विद्यार्थ्यांनी ताण-तणावात न राहता आनंद घेतला तरच आयुष्यात समाधानी राहताल, असे प्रतिपादन नेत्रतज्ञ डॉ.दिपा मोहाळे यांनी केले
वसंत टेकडी येथील डॉ.ना.ज.पाउलबुधे फार्मसी महाविद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक, स्नेहसंमेलन, सांस्कृतिक कार्यक्रमात प्रमुख पाहुणे डॉ.मंजिरी कुलकर्णी, डॉ.दिपा मोहाळे हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष रामभाऊ बुचकुल, तंत्र संचालक संजय पवार, पदाधिकारी साई पाउलबुधे, रघुनाथ कारमपुरी, प्राचार्या डॉ.रेखाराणी खुराणा, अनुराधा चव्हाण, संदिप कांबळे, सविता सानप, भरत बिउवे, अनिता सिद्दम, अंजली शिरसाठ, मीरा नराल आदि उपस्थित होते.
डॉ.मोहाळे यांनी विद्यार्थ्यांना सकारात्मक ध्येय निश्चित करुन जे क्षेत्र निवडाल त्यामध्ये जिद्दीने पदार्पण करुन परिश्रमाची जोड दिली तर यश हे निश्चित मिळते. औषधनिर्माण शास्त्र क्षेत्रात देखील खूप संधी उपलब्ध आहेत. मात्र त्यासाठी विद्यार्थ्यांनी योग्य नियोजन करुन अभ्यास केला तर त्यांना भविष्यकाळ चांगला असेल, असे त्या म्हणाल्या.
डॉ.मंजिरी कुलकर्णी म्हणाल्या, प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या मातृभाषेचे महत्व समजून ते पटवून दिले पाहिजे. जीवनात पैसा किती कमविला, यापेक्षा तो कसा कमविला हे महत्वाचे आहे. त्यासाठी नैतिक मुल्यांची जोपासना करा असे सांगितले.
यावेळी प्राचार्या डॉ.रेखाराणी खुराणा यांनी स्व.डॉ.नाथ पाउलबुधे यांनी शैक्षणिक संकुल उभारणीसाठी केलेले प्रयत्न, त्या प्रयत्नांना शिक्षकांनी दिलेली साथ व विद्यार्थ्यांनी तळमळीने शिक्षण घेऊन कठोर परिश्रमाने कॉलेजचे उंचावलेले नाव याबाबत माहिती दिली.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कला, क्रीडा, शिक्षण व उपक्रमात मिळविलेल्या यशाबद्दल विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात आली. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपली कला सादर करुन सर्वांची मने जिंकली.