औरंगाबाद- मार्च महिन्यात सुरु होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या नियोजित परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात, अशी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आली आहे. औरंगाबादमधील सुमित अरविंद पवार या विद्यार्थ्याने ही याचिका दाखल केली आहे. कोरोना काळात विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर विपरीत परिणाम झाला आहे. विद्यार्थी तणावात आहेत.
कोरोना संकटामुळे मागील वर्षभर शाळा अनियमित झाल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांचा पुरेसा अभ्यास झालेला नाही. आता मार्च महिन्यात परीक्षांच्या तारखा घोषित झाल्यामुळे विद्यार्थ्यांवर परीक्षेचे दडपणे आले आहे, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. त्यामुळे त्याने केलेल्या याचिकेत, दहावी-बारावीची परीक्षा शक्य असेल तर ऑनलाइन घेण्यात यावी अन्यथा अभ्यासक्रम पूर्ण न झाल्याने अभ्यास करण्यासाठी परीक्षा दोन महिने पुढे ढकलण्यात याव्यात, अशी विनंती करण्यात आली आहे. अॅड. बाबासाहेब भाले हे याचिकाकर्त्याकडून काम पहात आहेत.