धूळ मुक्त बाजारपेठेसाठी कॉंग्रेस सरसावली… व्यापार्यांशी थेट संवाद! मनपा आयुक्तांना भेटणार

0
336

नगर : चितळे रोड, तेलीखुंट, दाळमंडईसह संपूर्ण बाजारपेठेची खड्डे आणि धुळीमुळे भग्नावस्था झाली आहे. यामुळे व्यापाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी आज बाजारपेठेमध्ये व्यापाऱ्यांशी संवाद साधत धुळमुक्त व खड्डेमुक्त बाजारपेठेच्या मागणीसाठी स्वाक्षरी मोहीम राबविली. यामध्ये १००० हून अधिक व्यापाऱ्यांनी स्वाक्षरी करत काँग्रेसने घेतलेल्या भूमिकेला उस्फूर्त प्रतिसाद दिला.

यावेळी मनपा पदाधिकारी, अधिकारी, लोकप्रतिनिधी झोपा काढत आहेत. आम्हाला बाजारपेठेसाठी आमच्या हक्काचे रस्ते द्या, असे म्हणत व्यापाऱ्यांनी आपला आक्रोश व्यक्त करत काँग्रेसच्या स्वाक्षरी मोहिमेमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होत महानगरपालिकेच्या यंत्रणेवरील आपला रोष व्यक्त केल्या. मनपा आयुक्तांनी जाहीर केलेल्या १०० पूर्ण झालेल्या रस्त्यांमध्ये मात्र काँग्रेसने स्वाक्षरी मोहिम राबवलेल्या बाजारपेठेतील एकाही रस्त्याचा समावेश नसल्याचे काँग्रेसच्या वतीने करण्यात आलेल्या पाहणीमध्ये आढळून आल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. त्यामुळे आयुक्त हे खोटारडे असून नगरकरांची फसवणूक करत असल्याचा आरोप किरण काळे यांनी केला आहे.

यावेळी व्यापाऱ्यांनी काळे यांच्या समोर आपल्या व्यथा मांडल्या. महानगरपालिका आमच्याकडून कर संकलन करते. मात्र संपूर्ण बाजारपेठ खोदून ठेवली आहे. त्यामुळे धुळीचे साम्राज्य पसरले आहे. आमचा व्यवसाय निम्म्याहून कमी झाला आहे. त्यामुळे आमच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. महागाईचा फटका आम्हाला सुद्धा बसला आहे. आधीच कोरोनामुळे मागचे दोन वर्ष हे व्यवसायासाठी अडचणीचे गेले आहेत. ग्राहक खड्डे आणि धुळीमुळे बाजारात यायला तयार नाहीत. महापालिकेच्या अधिकारी, ठेकेदारांना काही बोलायला गेलं तर ते उडवाउडवीची उत्तरे देतात, असे म्हणत व्यापाऱ्यांनी महानगरपालिके संदर्भात असलेला आपला रोष काळे यांच्यासमोर व्यक्त केला.

यावेळी काँग्रेसच्या वतीने बाजारपेठेमध्ये पत्रके वाटण्यात आली. यामध्ये म्हटले आहे की, चितळे रोड, तेलीखुंट, दाळमंडईसह संपूर्ण बाजारपेठ ही *”रस्तेमुक्त”* झाली आहे. कुठेही रस्ता दिसेनासा झाला आहे. रशियाने यूक्रेनवर बॉम्ब हल्ले केल्याचे आपण पाहत आहोत. मात्र नगर शहरातील बाजारपेठेवर *”नेमका कुणी हल्ला”* केल्यामुळे येथील रस्ते उद्ध्वस्त झाले आहेत याचा व्यापारी बांधवांनी अंतर्मुख होऊन शोध घेण्याची गरज आहे. *बाजारपेठेची आजची ही भयानक स्थिती ही मनपा निर्मित असुन मनापनेच ती सोडविणे आवश्यक आहे.*

त्यामुळे विरोध कोणीच करू शकत नाही अशी एक मानसिकता आपल्यामध्ये जाणीवपुर्वक यशस्वीरित्या निर्माण करण्यात आली आहे. पण हे साफ खोटे आहे. नगरकर हे सोशिक नसून अन्यायाविरुद्ध आवाज उठविणारे आहेत. आपल्याला जरी जाहीरपणे रस्त्यावर येत आवाज उठविणे शक्‍य नसले तरी देखील आपण आपल्याला शक्य असेल त्या वेगवेगळ्या पद्धतीचा अवलंब करून शांततेत सुद्धा मोठा आवाज उठवू शकतात “, यावर आपण विश्वास ठेवला पाहिजे, असे काँग्रेसने आपल्या पत्रकात म्हटले आहे.

*आयुक्तांची काँग्रेस शिष्टमंडळ व्यापाऱ्यांसह भेट घेणार :*
काँग्रेसने राबवलेल्या स्वाक्षरी मोहीम नंतर व्यापाऱ्यांच्या सह्यांच्या निवेदनासह काँग्रेस पदाधिकारी हे शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली व्यापाऱ्यांसमवेत मनपा आयुक्तांची लवकरच भेट घेणार आहेत. भेट घेऊन व्यापाऱ्यांच्या भावना आणि मागण्या या आयुक्तां समोर मांडणार आहेत. यातून तातडीने महापालिकेने तोडगा न काढल्यास पुढील भूमिका ठरवणार असल्याचे ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा यांनी यावेळी बोलताना सांगितले.

यावेळी खलील सय्यद, दशरथ शिंदे, अनंतराव गारदे, प्रविण गीते, अनिस चुडीवाल, प्रा. डॉ. बापू चंदनशिवे, जितेंद्र तोरणे, विशाल घोलप, ओम नऱ्हे, उषा भगत, जरीना पठाण, राणी पंडित, जुबेर सय्यद, शारदाताई वाघमारे, हेमलता घाडगे, अमृता कानडे, बिबीशन चव्हाण, अरूण धामणे, प्रशांत जाधव, संजय भिंगारदिवे, प्रमोद डांगे, गणेश आपरे, गौरव घोरपडे, सागर चाबुकस्वार, मोहम्मद हनीफ जहागीरदार, मोहनराव वाखुरे, सागर ईरमल, विनोद दिवटे आदींसह काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.