भुजबळांचा दाखला देत शरद पवार म्हणाले… शिवसेना बंडखोरांना परिणाम भोगावे लागतील

0
945

मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन सध्याच्या राजकीय घडामोडींवर प्रतिक्रिया दिली. शिवसेनेविरोधात बंड पुकारुन गुवाहाटीला गेलेल्या आमदारांना परिणाम भोगावे लागतील, असं विधान शरद पवरांनी केलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बंडखोर आमदारांमागे भाजपचा हात नाही, असं विधान केलं आहे. त्यांच्या या विधानावर शरद पवार यांना प्रश्न विचारला असता शरद पवारांनी शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या व्हिडीओचा दाखला देत राष्ट्रीय पक्षांची यादीच वाचली.
“बंडखोर आमदारांची निधी न मिळण्याबाबतचा आरोप हे वस्तूस्थितीला धरुन नाही. त्यांनी जो निर्णय घेतला आहे तो कायद्याविरोधात आहे. त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील. त्यांनी मतदारसंघाचं फक्त कारण दिलं. छगन भुजबळ यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर त्यांच्यासोबत 12 ते 15 जण होती. त्यानंतर जी निवडणूक झाली होती त्यामध्ये एक-दोन जण सोडला तर बाकी सर्वांचा पराभव झाला होता, असा महाराष्ट्रातला अनुभव आहे. त्यामुळे जे लोक आता आसामला गेले आहेत त्यांच्यासोबत तसंच होऊ शकतं. त्यासाठी त्यांनी आपल्या मतदारांना निधीचा मुद्दा सांगितला आहे”, असं शरद पवार म्हणाले.