राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या मंत्री जयंत मामांना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा!
नगर : राज्याचे जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा आज वाढदिवस आहे. पाटील यांच्यावर राज्यभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. यात जयंत पाटील यांचे भाचे व राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनीही आपल्या मामांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना लहानपणीच्या आठवणींना उजाळा देत आठवणीतील फोटो शेअर केला आहे. शुभेच्छा देताना तनपुरे यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्य जलमय करण्याची इच्छा मनाशी बाळगून त्या दृष्टीने प्रत्येक पाऊल टाकणारे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुरोगामी विचारांची गंगा सर्वदूर पोहोचवणारे, जलसंपदा मंत्री मा. जयंत पाटील साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
प्रसंगी कठोर पण आपल्या कुटुंबासाठी, कार्यकर्त्यांसाठी अतिशय मृदू असलेले जयंत मामा मी लहानपणापासूनच वेळोवेळी पाहत आलेलो आहे. त्यांची नियोजनबद्ध कार्यपद्धती, निर्णयक्षमता, निश्चयाची दृढता मला नेहमीच प्रभावित करत आलेली आहे.त्यांच्या व्यक्तीमत्वाची सावली माझ्यावर सदैव पडत राहिली आणि मी घडत गेलो. थोडेसे का होईना पण त्यांच्या अथक लोकसेवेचे प्रतिबिंब माझ्याकडून पडो यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहील. जयंत मामांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो याच सदिच्छा!