संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांचं घर उद्ध्वस्त करायची सुपारी घेतली..

0
691

पुणे: भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना राजकारण गढूळ झालय असं वाटत असेल आणि ते सुडाचे राजकारण करत नसतील तर त्यांनी राऊतांना आता शांत बसवावे. सर्व काही ठिक होईल. संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांचं घर उद्ध्वस्त करायची सुपारी घेतली आहे असा माझा अंदाज आहे. उद्धवजींनी बटन ऑफ करून राऊतांना शांत करावं. आपोआप सगळं शांत होईल, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. मीडियाशी संवाद साधताना पाटील यांनी शिवसेना आणि संजय राऊतांवर घणाघाती हल्ला केला. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांच्या टीकेवर राऊत कसा पलटवार करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते रुग्णवाहिका लोकार्पण आणि अपंगांना साहित्याचे वाटप करण्यात आले. येरवडा येथील क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे युवक संघटना आणि आरपीआय आठवले गटाच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी ते बोलत होते.