३३ के.व्ही. नारायण डोह फिडरचे लोकार्पण, ‘या’ गावांतील शेतीपंपांना आठ तास वीज पुरवठा

0
1531

नगर: श्रीगोंदा मतदारसंघातील नगर तालुक्यातील मौजे मेहेकरी येथील महापारेषणच्या १३२/३३ के.व्ही. क्षमतेच्या वीज उपकेंद्रातून निघणाऱ्या ३३ के.व्ही. नारायण डोह फिडरचे लोकार्पण उर्जा राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या हस्ते करण्यात आले.
१३२/३३ केव्ही खांडके उपकेंद्रातून ३३ केव्ही मेहेकरी वाहिनी वर ३३/११ केव्ही मेहेकरी उपकेंद्र, चिचोंडी पाटील उपकेंद्र, नारायण डोह उपकेंद्र, दौला वडगाव उपकेंद्र, कापुरवाडी उपकेंद्र ही पाच उपकेंद्र होती. एकाच वाहिनीवर पाच उपकेंद्रे असल्यामुळे जास्त लोड जात होता.
त्यामुळे विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत होता. वरील पाचही उपकेंद्रामधून निघणाऱ्या ११ केव्ही शेती पंप वाहिनीवर आठ तासांऐवजी सहा तास पुरवठा दिला जात होता. त्याच प्रमाणे काही भागात ११ केव्ही शेती पंप वाहिनीवर अतिभार असल्यामुळे आठ तासऐवजी चार तास विद्युत पुरवठा केला जात होता.
आता नवीन वाहिनीवर नारायणडोह, कापूरवाडी व दौलावडगाव या तीन उपकेंद्राचा भार जोडलेला आहे. जुन्या मेहकरी वाहिनीवर मेहकरी व चिचोंडीपाटील उपकेंद्राचा भार राहिला आहे. त्यामुळे अतिरिक्त भार नियमन करण्याची गरज भासणार नाही व या पाचही उपकेंद्राअंतर्गत शेतीपंपाला पुरेशा दाबाने आठ तास वीज मिळेल.
या कार्यक्रमाला श्री. घनश्याम आण्णा शेलार, शिवसेना जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे सर, जि. प. सदस्य संदेश कार्ले, जि.प. सदस्य शरदभाऊ झोडगे, नगर तालुका शिवसेनाप्रमुख राजेंद्र भगत, राष्ट्रवादी काँग्रेस नगर तालुका अध्यक्ष उद्धवराव दुसुंगे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.