पालकमंत्री जाहीर झाल्यानंतर बीडचं पालकत्व अजितदादांकडे, छगन भुजबळ यांचं वक्तव्य चर्चेत…

0
63

पालकमंत्री जाहीर झाल्यानंतर काही जण नाराज आहेत असं विचारलं असता छगन भुजबळ यांनी उत्तर दिलं आहे. तसंच मी काही सरकारमध्ये नाही त्यामुळे मला ते पद देण्यात आलं नाही असंही छगन भुजबळ म्हणाले आहेत. कालपासून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ‘नवसंकल्प शिबिर’ शिर्डीत सुरु आहे. या अधिवेशनाला गेल्या काही दिवसांपासून नाराज असलेल्या छगन भुजबळ यांनी शनिवारी हजेरी लावली. मात्र काही वेळातच छगन भुजबळ अधिवेशन सोडून मुंबईकडे रवाना झाले. आज माध्यमांशी संवाद साधताना छगन भुजबळ यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले आहे.

महाराष्ट्रातील जिल्ह्यांचे पालकमंत्री जाहीर झाले आहेत. पण काही प्रमाणात नाराजी आहे असं विचारलं असता छगन भुजबळ म्हणाले, “मी सरकारमध्ये नाही त्यामुळे कोण नाराज वगैरे आहे ते मला माहीत नाही. मी कालच पालक मंत्र्यांची यादी वाचली आहे. बीडचं पालकमंत्री पद अजित पवारांनी घेतलं आहे ही चांगली गोष्ट आहे. पालकमंत्री हे पद मंत्र्यांना दिलं जातं. मी मंत्री नाही त्यामुळे मला ते पद दिलेलं नाही.” असं छगन भुजबळ म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसचं शिर्डीत अधिवेशन सुरु आहे. जे काही काम करु शकत नाहीत असे लोक असतील, जे फारसे अॅक्टिव्ह नाहीत अशा लोकांना बदललं पाहिजे. पक्षाचं संसदीय मंडळ स्थापन केलं गेलं पाहिजे त्यामध्ये हे निर्णय झाले पाहिजेत. जिल्हा परिषद महापालिका यांच्या निवडणुका आहेत अशा वेळीही या समित्या निवडीसाठी उपयोगाला येतील. सामूहिक निर्णय घेतले गेले पाहिजेत असंही छगन भुजबळ यांनी म्हटलं.

उदयनराजेंप्रमाणे तुम्हीही कॉलर उडवताना दिसला होतात, याबाबत विचारलं असता छगन भुजबळ म्हणाले, “नाही, नाही मी कॉलर उडवत नव्हतो. आमचे डॉक्टर सूर्या हे न्यूरॉलॉजिस्ट आहेत. बॉम्बे हॉस्पिटलमध्ये ते कार्यरत आहेत. त्यांची एपीएमसी फाऊंडेशन यांची संस्था आहे. त्यांचा ग्रुप चालला होता तेव्हा दाखवत होतो की मी सुद्धा तुमचा टी शर्ट घातला आहे. बाकी काय कॉलर उडवण्याचे दिवस पण गेले राव.” असं वक्तव्य भुजबळ यांनी करताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.