नगर शहरातील उड्डाणपुलाचे काम आता ९० टक्के पूर्ण झाले अाहे. उड्डाणपुलाच्या खालच्या दोन्ही बाजूने रंगरंगोटी सुरू करण्यात आली आहे. ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अर्थात पुढच्या ९० दिवसांत या उड्डाणपुलाचे काम पूर्ण होऊन हा वाहतुकीसाठी खुला होणार आहे. दरम्यान, वाहतुकीसाठी खुला करण्यापूर्वी या उड्डाणपुलावरून वाहनांची पहिली ट्रायल घेण्यात येणार आहे.
नगरचा उड्डाणपूल २२ महिन्यांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट होते. नियोजित वेळेपेक्षा दीड महिना अगोदर हा उड्डाणपूल पूर्ण होणार आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर या उड्डाणपुलाचे उद्घाटन होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे बीएसएनएल कार्यालयाच्या समोर पुण्याहून औरंगाबादकडे जाणाऱ्या वाहनांसाठी उतार असणार आहे. ते काम वेगाने सुरू असून पुढच्या महिन्याभरात या उताराचे काम पूर्ण होईल असा अंदाज आहे






