भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्या नाराजीची जोरदार चर्चा आहे. त्यांच्या पक्षांतराबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. विरोधकांकडून याच मुद्द्यावर भाजपावर टीका होत आहे, तर दुसरीकडे भाजपा नेत्यांकडून पंकजा मुंडे नाराज नसल्याचा दावा केला जात आहे. अशातच आता स्वतः पंकजा मुंडेंनी गोपीनाथ गडावर भाषण करताना या घडामोडींवर त्यांची भूमिका स्पष्ट केली.
पंकजा मुंडे म्हणाल्या, “मला भूमिका घ्यायची असेल तर पंकजा मुंडे अशीच सर्व माध्यमांना बोलावेल आणि समोर बसून बिनधास्त भूमिका जाहीर करेन. कुणाच्या तरी खांद्यावर बंदूक ठेऊन बंदूक चालवण्याएवढे खांदे अजून तरी मला मिळाले नाहीत. मात्र, माझ्या खांद्याची रुंदी इतकी आहे की, अनेक बंदुका माझ्या खांद्यावर विसावण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र, त्या बंदुकांना मी माझ्या खांद्यावर विसावू देणार नाही.पंकजा मुंडेचं महात्म्य सांगितलं जातं, कमीपणा सांगितला जातो. मी गोपीनाथ मुंडेंएवढी मोठी नाही म्हणतात. हो, बरोबर आहे. मला गोपीनाथ मुंडेंसारखं म्हणता तेही बरोबर आहे. गोपीनाथ मुंढेंपेक्षा पुढे जाल असा आशीर्वाद देता तेही मी नम्रपणे स्वीकारते,” अशी भावना पंकजा मुंडेंनी व्यक्त केली.