राज्यात तीन चाकी महाविकास आघाडीचे सरकार जाऊन शिंदे फडणवीस सरकार गेल्या वर्षीच्या जून महिन्यात सत्तेवर आले. आता या डबल इंजिन सरकारला आणखी एकाची साथ मिळाली आहे. राष्ट्रवादीतील अजित पवारांच्या गटाने सत्ताधाऱ्यांना साथ दिल्याने हे सरकार पुन्हा तीन चाकी सरकार झाले आहे. अजित पवारांवर टीका करूनच एकनाथ शिंदे महाविकास आघाडीतून बाहेर पडले होते. आता पुन्हा त्यांना मंत्रिमंडळात संधी दिल्याने शिंदे गट नाराज असल्याच्या चर्चा आहेत. यावरून शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी महत्त्वपूर्ण भाष्य केलं आहे
राष्ट्रवादीच्या येण्याने शिंदे गट नाराज आहे का? असा प्रश्न पत्रकारांनी त्यांना विचारला. त्यावर ते म्हणाले की, “नाराज होऊन काय करणार? वस्तुस्थिती स्वीकारावी लागणार आहे. थोडीफार नाराजी राहणार आहे. ज्यांना एक भाकरी खायची होती, त्यांना अर्धी मिळाली, ज्यांना अर्धी खायची होती त्यांना पाव भाकरी मिळाली. सगळं समीकरण घेऊन पुढे चालायचं असेल तर हे समीकरण स्वीकारायला पाहिजे”, असं भरत गोगावले म्हणाले.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात अजित पवारांनी विकास निधी दिला नाही म्हणून शिंदेंनी बंड केलं होतं, मग आता परत अजित पवारांसोबतच काम करावं लागणार आहे, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर भरत गोगावले म्हणाले की, “देशहित आणि राज्याहिासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी जे निर्णय घेतले आहेत ते मान्य करणं क्रमप्राप्त आहे. त्यांना कोणतं खातं द्यायचं हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ठरवतील.”






