राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्त्ये अंकुश चत्तर खून प्रकरणी अटकेत असलेल्या आठ जणांच्या पोलीस कोठडीची मुदत सोमवारी (दि. 24) संपली. त्यांना दुपारी न्यायालसमोर हजर केले असता न्यायालयाने वाढीव एक दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे.
15 जुलै रोजी रात्री अंकुश चत्तर यांच्यावर सावेडीतील एकविरा चौकात प्राणघातक हल्ला झाला होता. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. याप्रकरणी पोलिसांनी सराईत गुन्हेगार भाजपाचा नगरसेवक स्वप्निल रोहिदास शिंदे, अक्षय प्रल्हादराव हाके, अभिजीत रमेश बुलाख, महेश नारायण कुर्हे, सुरज उर्फ विकी राजन कांबळे, मिथुन सुनील धोत्रे, अरूण अशोक पवार व राजू भास्कर फुलारी यांना अटक केली आहे. ते पोलीस कोठडीत होते. त्यांच्या कोठडीची मुदत सोमवारी संपल्याने त्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केले होते.
या गुन्ह्याचे तपासी अधिकारी सहा. निरीक्षक गणेश वारूळे यांनी या गुन्ह्यात आणखी एकाचा सहभाग निष्पन्न झाला असून त्याला अटक करावयाची आहे, गुन्ह्यात वापरलेले वाहन व हत्यारे जप्त करायची आहेत, गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का? याचा शोध घ्यायचा असून पोलीस कोठडी मिळण्याची मागणी केली. न्यायालयाने आठही जणांना वाढीव एक दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे.