आ.संग्राम जगताप यांच्या सततच्या पाठपुराव्याला यश, माळीवाडा बसस्थानक इमारतीसाठी 16 कोटी मंजूर

0
35

माळीवाडा बसस्थानकाची सुसज्ज अशी इमारत उभी राहणार – आ.संग्राम जगताप

नगर : शहर विकासासाठी आ.संग्राम जगताप यांच्या सातत्याने सुरु असलेल्या पाठपुराव्याला यश मिळत आहे, त्यामुळे राज्य सरकारकडून विविध विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी प्राप्त होत आहे. त्यामुळे माळीवाडा बस स्थानकाच्या नवीन इमरतीसाठी 16 कोटी रुपये निधी आ.संग्राम जगताप यांनी मंजूर करून आणला.

माळीवाडा बसस्थानक हे जिल्ह्याचे मुख्य स्थानक आहे येथे विविध ठिकाणांहून प्रवासी ये – जा करत असतात. या बसस्थानकाची इमारत अत्यंत जुनी असून तिची दुरावस्था झाली आहे. या ठिकाणी सुविधांचा अभाव असल्याने येथे येणाऱ्या प्रवाश्यांची गैरसोय होत आहे. या माळीवाडा बसस्थानकाची समस्या लक्षात घेवून गेल्या 1 वर्षापासून या बसस्थानकाच्या विकासासाठी राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरु होता. आज अखेर त्याला यश मिळाले असून महाराष्ट्र सरकारच्या २०२२ – २३ करिता लेखाशीर्ष ६ फ योजने अंतर्गत राज्य परिवहन महामंडळाला ५२३ कोटी रुपये मंजूर झाले असून त्यापैकी माळीवाडा बसस्थानक इमारतीसाठी 16 कोटी मंजूर झाले आहेत. प्रशासकीय पातळीवर निविदा प्रक्रिया लवकरच मार्गी लागून या इमारतीचे काम सुरु होईल व नगर शहराच्या वैभवात भर घालेल अशी सुसज्ज माळीवाडा बसस्थानकाची नवीन इमारत उभी राहील, अशी माहिती आ.संग्राम जगताप यांनी दिली.

माळीवाडा बसस्थानकाची इमारत भव्य दिव्य अशी उभी राहणार आहे, यात तळमजला, पहिला मजला व दुसरा मजला याचबरोबर पाणी पुरवठा सुविधा व सांडपाणी व्यवस्था, विद्युत कामे, फायर फायटिंग, रेन वॉटर हार्वेस्टिंग, वाहन तळ कॉंक्रिटीकरण, पेव्हर ब्लॉक पार्किंग, कुंपण भिंत आदी सुविधा प्रवाश्यांना उपलब्ध होणार असून नगर शहर महानगराकडे वाटचाल करत आहे असे ते म्हणाले.