तब्बल 17 महिन्यानंतर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना जामीन मिळाला आहे. आरोग्याच्या कारणास्तव सर्वोच्च न्यायालयाने मलिक यांना दोन महिन्यासाठी जामीन दिला आहे. त्यामुळे मलिक यांना मोठा दिलासा मिळाला आहे.लिक यांना जामीन मिळाल्यानंतर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाने जोरदार जल्लोष केला. दोन्ही गटांनी पेढे वाटून आनंद साजरा केला. मात्र, मलिक नेमके कोणत्या गटाचे आहेत हे अद्याप स्पष्ट झाले नाही. नवाब मलिक हे तुरुंगातून बाहेर आल्यावर शरद पवार गटाचा झेंडा हाती घेणार की अजितदादा गटाचा यावर अजूनही सस्पेन्स आहे.
दरम्यान, अजितदादा गटाकडून नवाब मलिक यांच्या सुटकेचं स्वागत केलं आहे. मात्र, अजितदादा गटाने सावध प्रतिक्रिया दिली आहे. अजितदादा गटाचे नेते, खासदार सुनील तटकरे यांनी अत्यंत सावध प्रतिक्रिया दिली आहे. मलिक यांना जामीन मिळाला याचे समाधान आहे. मलिक हे ज्येष्ठ नेते आहेत. अनेक वर्षांपासून नेतृत्व करत आहेत. ते बाहेर आल्यावर योग्य निर्णय घेतील. मी त्यावर बोलणार नाही. आएधी त्यांना बाहेर येऊ द्या. त्यांना निर्णय घेऊ द्या. त्यानंतर आम्ही प्रतिक्रिया देऊच की, असं सुनील तटकरे म्हणाले.