राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पुण्यात पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात भेट झाली. या भेटीवर खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. शरद पवारांच्या भूमिकेवर संभ्रम फार काळ राहता कामा नये, असं संजय राऊत यांनी म्हटलं होतं. या विधानावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते बारामतीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
शरद पवार म्हणाले, “संभ्रम वगैरे काही नाही. महाविकास आघाडी विचाराने एकत्र आहे. देशात आणि राज्यात ज्यांची भूमिका भाजपाशी संबंधित आहे. त्या घटकांशी आमचा कोणत्याही संबंध असल्याचं कारण नाही. ही भूमिका स्पष्ट झाल्यानंतर संभ्रम राहिला नाही. एकदा गोष्ट स्पष्ट केल्यानंतर पुन्हा-पुन्हा संभ्रम निर्माण करू नका.”