नगर: करोना काळात केंद्र सरकारकडून वेश्यांसाठी आलेले अनुदानात शहरातील एका संस्थेने अपहार केल्याची तक्रार आल्यानंतर पोलीस अधिक्षकांनी या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्याच्या अधिकार्याला चौकशी करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती आरपीआयचे माजी शहर जिल्हाध्यक्ष नाना पाटोळे यांनी दिली.
नगर शहरात व जिल्ह्यात एड्सबाधित, वेश्या व्यवसाय करणार्या महिलांसाठी कार्य करणार्या एका संस्थेने करोनाच्या टाळेबंदीत केंद्र सरकारकडून आलेल्या अनुदानात केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी आरपीआय (आठवले) चे माजी शहर जिल्हाध्यक्ष नाना पाटोळे यांनी केली होती. शहरात एड्स बाधित व वेश्या व्यवसाय करणार्या महिलांसाठी कार्य करणार्या एका संस्थेला केंद्र सरकारकडून करोनाच्या टाळेबंदीत प्रत्येकी 15 हजार रुपये अनुदान वितरित करण्यात आले होते.
अनुदानाच्या यादीत वेश्या व्यवसायासाठी कुठलाही संबंध नाही, अशा महिलांची नावे समाविष्ट करण्यात आली असल्याचा आरोप तक्रारदार एका महिलेने केला होता. याप्रकरणी आरपीआयच्या शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले. या कागदपत्रांची पाहणी करुन पोलीस अधिक्षकांनी स्थानिक पोलीस स्टेशनच्या प्रमुखांना फोन करून सदर घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत






