मी आजही शरद पवारांच्या संपर्कात, अजितदादांच्या गटातील बड्या नेत्याचा दावा…

0
18

अजित पवार यांच्यासह काही आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षात फूट पडून दोन गट निर्माण झाले आहेत. राष्ट्रवादीतील अनेक आमदार तसेच पदाधिकाऱ्यांनी अजित पवारांना पाठींबा दिला आहे. तर काही आमदार तसेच पदाधिकारी आजही शरद पवारांच्या पाठीमागे ठामपणे उभे आहेत.

दरम्यान, अजित पवार यांच्या गटाकडून शरद पवार यांची सातत्याने मनधरणी सुरू आहे. मात्र, शरद पवार आपल्या भूमिकेवर ठाम आहे. अशातच अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी एक खळबळजनक विधान केलं आहे. माझ्यात आणि शरद पवारांमध्ये नेहमी चर्चा होत असते, मी आजही त्यांच्या संपर्कात आहे, असं विधान प्रफुल्ल पटेल यांनी केलं आहे.
त्यांच्या या विधानामुळे एकच खळबळ उडाली आहे. एकीकडे पक्ष फुटलेला असताना राष्ट्रवादीचे नेते एकमेकांच्या संपर्कात असून ते कुणाला शह आणि काटशह देत आहेत? पडद्यामागे नेमकं चाललंय काय? राष्ट्रवादीच्या या खेळीचा अर्थ काय? असे सवाल या निमित्ताने केले जात आहेत.

अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल रविवारी अमरावतीत आले होते. यावेळी त्यांनी एका कार्यक्रमात बोलताना मागील वेळी अमरावतीला शरद पवार यांच्या सोबत आलो होतो. आज अजित पवार यांच्या सोबत आलो आहे. आमचा पक्ष बळकट करण्यासाठी मी आलो आहे, असं सांगितलं
अनेकांच्या मनात संभ्रम आहे की खरंच मी इकडे आलो? की शरद पवार यांनी मला पाठवले का? शरद पवार साहेब यांच्या बदल असलेला आदर आजही कायम आहे. आणि पुढेही राहील. शरद पवार माझे नेते होते आणि पुढेही राहतील, असं विधानही प्रफुल्ल पटेल यांनी यावेळी केलं.

माझे शरद पवार यांच्यासोबत १९७८ पासूनचे संबंध आहे, माझे आणि शरद पवार यांचे आजही फोनवर बोलणे होत असते, असा गौप्यस्फोट प्रफुल्ल पटेल यांनी केला आहे. पटेल यांनी हा गौप्यस्फोट करून एकप्रकारे भाजपलाच इशारा दिला असल्याचं सांगितलं जात आहे