हवामानाचा लहरीपणा, नापिकी, शेतमालाला मिळणारा कमी भाव आणि या सगळ्याचा परिणाम म्हणून कर्जाच्या वाढत जाणाऱ्या डोंगराखाली दबलेल्या बळीराजाला केंद्रातील मोदी सरकारनं दिवाळीआधीच गोड बातमी दिली आहे. रब्बीतील सहा महत्वाच्या पिकांवरील किमान आधारभूत किंमत वाढवण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
केंद्र सरकारने 6 रब्बी पिकांसाठी एमएसपी म्हणजेच किमान आधारभूत किंमत 2 टक्क्यांवरून वरून 7 टक्क्यांपर्यंत वाढवण्यास मंजुरी दिली आहे. या निर्णयाला सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता दिली.
गहू आणि मोहरीसह 6 पिकांच्या एमएसपीमध्ये वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. गहू, जौ, हरभरा, मसूर, सूर्यफूल आणि मोहरी या मुख्य रब्बी पिकांचे एमएसपी वाढवण्यात आले आहेत. मसूर आणि मोहरीच्या किमान आधारभूत किमतीत सर्वाधिक वाढ करण्यात आली आहे.
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी या निर्णयाबद्दल माहिती देताना म्हटलं की, शेतकऱ्यांचे उत्पन्न दीड पटीने वाढवणार आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत तेलबिया आणि मोहरीच्या भावात प्रति क्विंटल 200 रुपये, मसूर 425 रुपये, गहू 150 रुपये, जौ 115 रुपये, हरभरा 105 रुपये, आणि सूर्यफुलाला प्रतिक्विंटल 150 अधिकचा दर मिळणार आहे.






