नगर : भाजपमध्ये बाहेरचे लोक घेण्याचे वाढते प्रकार पाहता मूळ भाजपवाल्यांचे काय होणार असा प्रश्न पडतो, अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. मुंबई, ठाण्यातील गोळीबाराच्या घटना पाहता राज्यकर्तेच गुन्हेगार झाल्याचा व त्याविरोधात आता जनतेनेच आवाज उठवणे आवश्यक आहे, असे आवाहनही त्यांनी केले. जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदी जयंत वाघ यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांचा सत्कार आमदार थोरात यांच्या उपस्थितीत शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केला. त्यावेळी आमदार थोरात पत्रकारांशी बोलत होते. आमदार लहू कानडे, मनोज गुंदेचा आदी पदाधिकारी उपस्थित होते. बाहेरहून भाजपमध्ये घेतल्या जाणाऱ्या लोकांबद्दल नितीन गडकरी स्पष्ट बोलतात. अटलजींनंतर चांगले व्यक्तिमत्त्व म्हणजे नितीन गडकरी आहेत. त्यांना राजधर्म कळतो. आम्ही लाठ्या काठ्या खाऊनही पक्ष सोडला नाही, आता मात्र चौकशी सुरू झाली की लगेच उंदरांसारखे पळतात व इकडून तिकडे उड्या मारण्याच्या राजकारणातील प्रकारावरही ते नाराजी व्यक्त करतात. पण दुसरीकडे भाजपमध्ये बाहेरचे लोक घेण्यावर भर दिला जात असल्याने मूळ भाजपवाल्यांचे आता काय होणार, असा माझा त्यांना प्रश्न आहे, असे आ. थोरात म्हणाले. राज्यातील गोळीबाराच्या, गुन्हेगारीच्या घटना पाहता राज्य सरकारचा धाक राहिलेला नाही, गृहखाते अपयशी ठरले आहे. गुन्हेगारांना आधार सत्तेचा आहे व आपले कोणी काही करू शकत नाही, अशा भावनेत ते दहशत करीत आहेत. सत्ताधारीच गुन्हेगार झाल्याचे दिसत आहे. सत्ताधारी भाजपचा आमदार मुख्यमंत्र्यांवर गुंडगिरीचा आरोप करतो, त्याचा खुलासा मुख्यमंत्र्यांनी करायला हवा.






