Ahmednagar Crime…गर्भपाताच्या औषधांचा मोठा साठा जप्त, थेट हरियाणा कनेक्शन आले समोर

0
805

नगर : नगरमध्ये जप्त करण्यात आलेल्या गर्भपाताच्या औषधाच्या गोळ्या हरियाणातून नगरमधील एका एजन्सीच्या नावे आल्याचे उघड झाले आहे. ही एजन्सी आणि बेकायदा औषध पुरवठा करणाऱ्यांविरूद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त ज्ञानेश्वर दरंदले यांनी फिर्याद दिली. त्यानुसार एमआयडीसी पोलिस ठाण्यात नगरच्या श्रीराम एजन्सीचे मालक नितीन जगन्नाथ बोठे (रा. टीव्ही सेंटर, सावेडी) आणि ही औषधे नगरला पाठविणाऱ्या आयव्हीए हेल्थ केअर कंपनीच्या संचालक मंडळाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एमआयडीसीतील ट्रान्सपोर्ट कंपनीत हा साठा आढळून आला होता. एमआयडीसी पोलीस व औषध प्रशासनाने सात लाख ६६ हजार ४४० रूपये किंमतीचा साडेचार हजार गोळ्यांचा हा साठा जप्त केला. आतमध्ये गर्भपाताच्या गोळ्या आणि सोबत बिल मात्र दुसर्‍या गोळ्यांच्या नावाचे होते. त्यामुळे यासंबंधी संशय आल्याने तपास सुरू करण्यात आला.

श्रीराम एजन्सी आंनद बाजार, पटवर्धन चौक येथे नोंदणीकृत आहे. मात्र, बोठे त्यांच्या घरातून हा व्यवसाय करीत असल्याचे आढळून आले. पोलीस आणि अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी तपास करीत आहेत.