ज्येष्ठ नेते शरद पवार यांची फेसबुक पोस्ट…
मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित छायाचित्रांच्या प्रदर्शनास भेट दिली. बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू उलगडणाऱ्या छायाचित्रांमधून त्यांच्या आठवणींना उजाळा देता आला.
विद्यार्थीदशेच्या काळानंतर अनेक वर्षानंतर मला या वास्तूत यायची संधी मिळाली. मुंबईतील काही वास्तू जगप्रसिद्ध आहेत. त्या जगप्रसिद्ध वास्तूंमध्ये मुंबई विद्यापीठाची ही वास्तू अत्यंत महत्त्वाची आहे. इथल्या वास्तूमध्ये हा आगळावेगळा कार्यक्रम आज इथे घेतला जात आहे.
बाळासाहेब ठाकरे यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन तसेच त्यांच्या नावाने काही अभ्यासक्रमही इथे सुरू करण्यात आले. बाळासाहेब ठाकरे हे एक अलौकिक व्यक्तिमत्व होतं. आमचे त्यांच्याशी अतिशय घनिष्ट संबंध होते, तसेच आमच्यात संघर्षही होता.
मला आठवतंय, मी पूर्वी खेडगल्ली, दादर येथे राहायला होतो. त्याच काळात नुकतीच शिवसेनेची स्थापना बाळासाहेबांनी केली होती. ज्यावेळेस राजकारणात माझ्या खांद्यावर काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या आल्या आणि मी माझ्या कामाला सुरुवात केली, त्याचवेळेस शिवसेनेचा महाराष्ट्रभर प्रसार होत होता.
आम्ही दोघांनीही भाषणांमधून एकमेकांवर खूप टीका केली. त्याकाळात आम्ही दिवसभर कुठेही असलो तरी संध्याकाळी एकत्र असायचो. मीनाताई आमच्या आवडीचं जेवण बनवायच्या, तासन् तास आमच्या गप्पा चालायच्या, काही महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा व्हायची.
बाळासाहेबांचं एक वैशिष्ट्य होतं. त्यांनी महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात एक नवनेतृत्व तयार केलं. या नेतृत्वातील बहुसंख्य नेते हे सामान्य घरातील होते. ज्यांना आयुष्यात कधीही विधानसभा आणि संसद माहीत नव्हती त्या लोकांना बाळासाहेबांनी मोठमोठ्या पदांवर बसवलं.
त्यामुळे अशा या मोठ्या व्यक्तीचं आज या ठिकाणी छायाचित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आलं. अत्यंत देखणं असं हे प्रदर्शन आहे. बाळासाहेब स्वत:ही एक कलाकार आणि व्यंगचित्रकार होते.
त्यांच्या व्यंगचित्रांना एक प्रकारची धार असायची. त्या धारेचा विरोधकांवर जो काही परिणाम व्हायचा त्याची किंमत मलासुद्धा कधीकधी मोजावी लागली.
आज या छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करून फोटोग्राफी असोसिएशनने अतिशय उत्तम काम केलं आहे. माझी खात्री आहे की मुंबईकरांसमवेत बाळासाहेबांविषयी आस्था असणाऱ्या लोकांना हे प्रदर्शन पाहून एक वेगळेच समाधान मिळेल.