Sharad Pawar: नगरच्या सभेतून शरद पवार गरजले; विधानसभेची तुतारी फुंकली!

0
14

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आज अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. राष्ट्रवादीचे नेते दिवंगत अशोक भांगरे यांच्या जयंती सोहळ्यास ते उपस्थित राहणार असून अकोलेमध्ये त्यांच्या उपस्थितीत भव्य शेतकरी मेळावा पार पडला. अशोक भांगरे यांचे पुत्र अमित भांगरे यांनी या मेळाव्याचे आयोजन केले होते. खासदार निलेश लंके, भाऊसाहेब वाकचौरे आदी नेते यावेळी उपस्थित होते. यावेळी बोलताना शरद पवार यांनी नुकत्याच झालेल्या लोकसभा तसेच आगामी विधानसभा निवडणुकांबाबत भाष्य केले.

“बळीराजासाठी सत्ता वापरणे हे सूत्र राज्यकर्त्यांचे असले पाहिजे. मात्र देश आज वेगळ्या संकटातून जात आहे. शेतीला जोडधंदा म्हणून दूध धांद्याकडे बघितले जाते, मात्र आज त्यासाठी संघर्ष करण्याची वेळ येते. नाशिक, सातारा, पुणे, सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी कशाचा विचार न करता कांद्याचे पीक घेतो. त्याला रास्त दर मिळावा एवढीच मागणी असते,”

“मात्र कांद्याला दर मिळत नाही. मोदींच्या नाशिकच्या सभेत एक शेतकरी उठला आणि म्हणला तुम्ही जगाच्या गोष्टी सांगताय, माझ्या कांद्याला भाव द्या’ पोलिसांनी त्याला पकडलं आणि आत टाकलं. कांद्याला भाव मागण्याचा अधिकार या देशात नाही. हे मोदींच्या राज्यात नाशिकमध्ये समोर आलं,” असा टोला शरद पवार यांनी लगावला.”आजच्या राज्यकर्त्यांना शेती आणी शेतकरी यांची आस्था नाही. आता तुमची आमची जबाबदारी आहे. लोकसभेत तुम्ही उत्तम काम केलंय. पाच वर्षापूर्वी काॅग्रेसला एक आणि राष्ट्रवादीला चार जागा मिळाल्या होत्या. या निवडणुकीत 48 पैकी 31 जागा जिंकल्या याचा अभिमान आहे,” असं शरद पवार म्हणाले.

“लोकसभेने एक नवी दिशा देशाला दाखवली आहे. सत्तर दिवसांनी विधानसभेची निवडणूक आहे. आता तयारीला लागा. तुम्ही सर्व एकत्र असाल तर कुणीही धक्का लावू शकत नाही, सत्ता तुमच्या हातात आल्याशिवाय राहत नाही, आता काही मागायचं नाही ठरवलंय. तुम्ही मला अनेकदा निवडून दिलयं, आता फक्त महाराष्ट्रात सर्वसामान्यांच्या हिताचं सरकार आणायच आहे. ते आणण्यासाठी तुमची शक्ती हवीय’ असे म्हणत शरद पवार यांनी विधानसभेचे रणशिंग फुंकले.