राष्ट्रवादी काँग्रेसच्या फलकावरील ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’तून ‘मुख्यमंत्री’ वगळले गेले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाढदिवसाचे औचित्य साधत, विधानसभा निवडणुकीचा वेध घेत ‘लाडक्या बहिणीं’शी संवाद साधण्यासाठी दौऱ्याची नगरमधून सुरुवात केली. जिल्ह्यात अजित पवार यांच्या उपस्थितीत आयोजित चारही सभांच्या आणि विविध ठिकाणी लावलेल्या फलकांवरून, योजनेतील ‘मुख्यमंत्री’ शब्द राष्ट्रवादीने काढून टाकलेला आढळला. त्याऐवजी केवळ ‘माझी लाडकी बहीण योजना’ असाच उल्लेख केला आहे.
राज्य सरकारने ही योजना सादर करताना आणि या योजनेचा अध्यादेश जारी करताना ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या नावाने सादर केली. त्याचे राजकीय श्रेय घेण्याची धडपड सध्या तीनही सत्ताधारी पक्षांत सुरू आहे. उपमुख्यमंत्री पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत, जिल्ह्यात पारनेर, नगर शहर, श्रीगोंदा व कर्जत येथे संवाद मेळावे आज आयोजित करण्यात आले होते. या मेळाव्यांना कृषिमंत्री धनंजय मुंडे, महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे, पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, युवकचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण आदीही उपस्थित होते.
उपमुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत राष्ट्रवादी काँग्रेसने तयार केलेले अर्ज, माहितीपत्रक, प्रचारपत्रक यांवरूनही ‘मुख्यमंत्री’ हा शब्द गायब करण्यात आलेला आहे. योजनेच्या प्रचाराचे जे शासकीय पत्रक आहे, त्यावर मात्र ‘मुख्यमंत्री’ हा शब्द कायम आहे. त्याचबरोबर राज्य सरकारने या योजनेच्या माहितीसाठी शहरात उभारलेल्या फलकांवरही ‘मुख्यमंत्री’ शब्द कायम आहे. केवळ राष्ट्रवादीच्या आणि उपमुख्यमंत्री पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत उभारलेल्या फलकावरून ‘मुख्यमंत्री’ शब्द गायब झालेला आहे.