अवाढव्य खर्चामुळे राज्याचा अर्थविभाग ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’साठी राजी नव्हता, अर्थ विभागाने या योजनेला विरोध दर्शवला होता, अशी कुजबुज राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात सुरू असल्याच्या बातम्या काही वृत्तवाहिन्यांनी प्रसिद्ध केल्या होत्या.
महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी यावर खुलासा केला आहे. तटकरे यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की या विभागाची (महिला आणि बाल कल्याण) मंत्री म्हणून मी जबाबदारीने सर्व प्रसारमाध्यमांना सांगू इच्छित आहे की असं कोणतेही आक्षेप उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार आणि त्यांच्या अर्थ विभागाने योजना जाहीर केल्यानंतर घेतले नाहीत. महिला सक्षमीकरणाचा दृष्ट्रीकोन डोळ्यांसमोर ठेवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व प्रक्रिया पूर्ण करुन आणि योजना राबविण्यासाठी लागणाऱ्या निधीची पूर्तता करून ही योजना सुरू केली आहे.
तटकरे म्हणाल्या, प्रसारम माध्यमांवर दाखवल्या जाणाऱ्या तथ्यहिन बातम्यांमुळे योजनेबाबत राज्यातील महिला भगिनींमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो. योजनेबाबत आपणांस माहिती हवी असल्यास विभागाची मंत्री म्हणून मी सदैव तत्पर आहे. एकनाथ शिंदे, देवेंद्रजी फडणवीस व अजित पवार यांच्या सक्षम नेतृत्वाखाली असलेलं राज्य सरकार ही योजना यशस्वी करुन सर्व लाभार्थी माता-भगिनींना योजनेचा लाभ मिळवून देत महिला सक्षमीकरणासाठी घेतलेला वसा पुर्णत्वास नेणार आहे.