मराठा आंदोलक थेट ‘मातोश्री’वर पोहचले…उध्दव ठाकरेंनी भूमिका जाहीर करण्याची मागणी

0
16

महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी मराठा आरक्षणाबाबतची आपली भूमिका स्पष्ट करावी, यासाठी मराठा आंदोलकांचा एक गट सक्रिय झाला आहे. याच गटाने मंगळवारी रमेश केरे पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली उद्धव ठाकरे यांना जाब विचारण्यासाठी मातोश्रीवर धडक मारली. उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणाबाबतची भूमिका स्पष्ट केल्याशिवाय आम्ही माघार घेणार नाही, असा पवित्रा या मराठा आंदोलकांनी घेतला. या आंदोलनाची लाईव्ह प्रक्षेपण सुरु असल्याने क्षणागणिक उद्धव ठाकरे यांची कोंडी होताना दिसत होती.

मराठा आंदोलकांनी मातोश्रीवर धडक दिल्याचे समजताच अंबादास दानवे तातडीने त्याठिकाणी पोहोचले. यानंतर अंबादास दानवे हे स्वत: मराठा आंदोलकांना सामोरे गेले. तत्पूर्वी मातोश्रीवर ज्यांच्या नेतृ्त्त्वाखाली मोर्चा काढण्यात आला आहे ते रमेश केरे पाटील हे भाजपचे कार्यकर्ते आहेत. ते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या चेंबरमध्ये काही दिवसांपूर्वी दिसले होते, असे अंबादास दानवे यांनी म्हटले. त्यानंतर अंबादास दानवे मातोश्रीसमोर जमलेल्या मराठा आंदोलकांच्या जमावासमोर गेले. तु्म्ही कोणाच्या सांगण्यावरुन इकडे आलात, मला माहिती आहे, असा थेट हल्ला अंबादास दानवे यांनी चढवला. अंबादास दानवे यांच्या आक्रमक पवित्र्यासमोर आंदोलकांच्या जमावाने आपली बाजू मांडायला सुरुवात केली. आम्ही फक्त उद्धव ठाकरेंच्या घरासमोर नव्हे तर शरद पवार, नाना पटोले आणि मुख्यमंत्र्यांच्या घरासमोरही आंदोलन करणार आहोत, असे आंदोलकांनी अंबादास दानवे यांना सांगितले.