अहमदनगर – शहरातील बालकलाकार आरुष बेडेकर हा 30 मे पासून कलर्स मराठी या चैनल वर सुरू होणार्या योग योगेश्वर जय शंकर या मालिकेत बालशंकर महाराजांची प्रमुख भूमिका साकारणार आहे. ’भगवान मंदिर मे नही मन मे होता है‘ असा संदेश देणार्या आणि आपल्या भक्तांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलेल्या सद्गुरु शंकर महाराजांवर कलर्स मराठी या चॅनलवर योग योगेश्वर जय शंकर ही एक नवीन मालिका सुरू होते आहे. या मालिकेमध्ये बाल शंकर महाराजांच्या मध्यवर्ती भूमिकेत नगरचा आरुष प्रसाद बेडेकर दिसणार आहे. आरुष रामकृष्ण एज्युकेशन फाउंडेशन या शाळेमध्ये इयत्ता चौथीमध्ये शिकतोय. लहानपणापासूनच आरुष थिएटरशी संबंधित आहे. त्याने आतापर्यंत विविध नाट्य स्पर्धांमध्ये सहभाग घेतलेला असून, नाट्यछटा स्पर्धांमध्ये सुद्धा त्याने अनेक बक्षिसे मिळवली आहेत. लॉकडाऊनमध्ये त्यानी काही ऑनलाईन नाट्य प्रशिक्षण कार्यशाळांमध्ये पण भाग घेतला होता. वयाच्या सहाव्या वर्षापासून आरुष डबिंग आणि व्हॉइस ओव्हरचे सुद्धा काम करतो.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने वापरल्या जाणार्या दीक्षा ऍपवरसुद्धा आरुषच्या आवाजात रेकॉर्ड केलेली इयत्ता तिसरीची पुस्तके आपल्याला ऐकायला मिळतात. पुण्यामध्ये सी-शार्प या रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये आरुषचे सगळ्या विषयाचे डबिंग करण्यात आले होते. ते डबिंग तो दुसरीत असताना त्याने केले होते. ज्या वेळेला त्याला पुस्तके वाचता येत नव्हती पण समोरच्याने सांगितलेले बरोबर ऐकून त्याच्यातील चढ-उतार समजावून घेऊन तो ते डबिंग करायला शिकला होता. त्याच बरोबरीने त्याच्या वडीलांबरोबर सुद्धा अनेक जाहिरातींसाठी सुद्धा व्हॉइस ओव्हरचे काम केलेले आहे. तो सध्या लॉकडाऊनमध्ये साऊंड एडिटिंग सुद्धा शिकण्याचा प्रयत्न करत होता.
नुकत्याच अहमदनगर मध्ये चित्रित झालेल्या ’ए फक्त तूच’ या चित्रपटानंतर त्याला या सिरीयलची ऑफर आली. त्यानंतर काही ऑनलाईन आणि काही ऑफलाईन ऑडिशन आणि लूक टेस्टनंतर त्याची या मध्यवर्ती भूमिकेसाठी निवड झाली. जवळपास दीडशे कलाकारांमधून आरुषची या भूमिकेसाठी निवड करण्यात आली. अभिनेते चिन्मय उदगीरकर यांची सहनिर्मिती असलेल्या या मालिकेमध्ये शंकर महाराजांच्या जन्मापासून शंकर महाराजांचे सगळे चरित्र दाखवण्यात येणार आहे. या मालिकेमध्ये आरुष बरोबरच आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणार्या उमा पेंढारकर आणि अतुल आगलावे यांच्यासह अक्षता कुलकर्णी आणि अन्य कलाकार सुद्धा अभिनय करताना दिसणार आहेत. या सिरीयलचे संपूर्ण शुटिंग सध्या नाशिक येथे सुरू आहे. नाशिकच्या पाथर्डी रोडवर एक मोठा सेट उभारण्यात आला आहे. सेटवर आरुष हा सगळ्यांचा एकदम लाडका कलाकार बनला. जरासा खोडकर असणारा आरुष सगळ्यांच्या बरोबर मस्ती करत करत असल्याने तो सगळ्यांना नेहमी सेटवर हवाहवासा वाटतो. त्याच्याबरोबर त्याच्या आई-वडिलांची भूमिका करणारे उमा पेंढारकर आणि अतुल आगलावे हे तर नेहमी हा खरोखरच मागच्या जन्मीचा आमचा मुलगा आहे, असे म्हणतात. सिरीयलचे दिग्दर्शन हे रघुनंदन बर्वे करत आहेत तर लेखन लेखक शिरीष लाटकर यांचे आहे. बेडेकर्स इंग्लिश क्लासेसचे संचालक श्रीकांत बेडेकर आणि अविनाश बेडेकर यांचा तो नातू आहे.






