दोन लाखांची लाच, सरपंचांसह ग्रामपंचायतीचा लिपिक एसीबीच्या ताब्यात

0
40

चाळीसगाव (जळगाव) : शेतकऱ्याची मालकीची जमीन असताना शेतजमिनीबाबत न्यायालयाचा त्रास होऊ नये, यासाठी सरपंचाने ७० वर्षीय तक्रारदाराकडे दहा लाखांची मागणी केली. तडजोडीअंती ठरलेल्या रक्कमेतील दोन लाखांची रक्कम दुसऱ्या एकाच्या हातून स्वीकारल्याप्रकरणी सरपंचांसह ग्रामपंचायतीचा लिपिक व सरपंचाचा हस्तक अशा तिघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे.

चाळीसगाव तालुक्यातील बहाळ रथाचे येथील ७० वर्षीय वृद्ध तक्रारदाराची कब्जे वहिवाटीत शेतजमीन आहे. या शेतजमिनीवर ग्रामपंचायतीने त्यांचा हक्क दाखवून ही जागा परस्पर इतर व्यक्तीला भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय घेतला होता. त्याविरोधात तक्रारदाराने न्यायालयात दाद मागितली होती. यावर न्यायालयाने ग्रामपंचायतीविरुद्ध कायमस्वरूपी मनाई हुकूम आणला होता. यानंतर देखील सरपंचाकडून त्रास सुरु होता.

दरम्यान सरपंच राजेंद्र महादू मोरे यांनी तक्रारदाराला भेटून त्यांच्या शेतजमिनीबाबत न्यायालयात त्रास होऊ द्यायचा नसेल, तर शेतजमिनीतून दीड हजार चौरस फुटाचा प्लॉट मला खरेदी करून देण्याचे सांगितले. त्यावर तक्रारदाराने प्लॉट स्वरूपात काही एक देऊ शकणार नाही, असे सांगितले. त्यानंतर सरपंच राजेंद्र मोरे यांनी तक्रारदाराकडे दहा लाख रुपयांची मागणी करत पैसे न दिल्यास कोर्ट कचेऱ्यांचा त्रास सहन करावा लागेल, असेही सांगितले.