अहिल्यानगर-महावितरणमध्ये खासगी कंपनीमार्फत बाह्य स्त्रोत यंत्रचालक म्हणून नियुक्ती आदेश देण्यासाठी 15 हजारांची लाच घेतल्याप्रकरणी तिघांविरूध्द येथील कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही कारवाई केली असून दोघांना ताब्यात घेतले आहे. प्रदीप ऊर्फ विशाल विष्णू देवतरसे (वय 32, लिपिक जी. के. एंटरप्राइजेस, एमआर ट्रेड सेंटर, वाडिया पार्क, अहिल्यानगर, रा. राजेश्वर सोसायटी, मोहिनीनगर, केडगाव), विनोद बाबासाहेब दळवी (वय 28 लिपिक जी. के. एंटरप्राइजेस, एमआर ट्रेड सेंटर, वाडिया पार्क, अहिल्यानगर, रा. दळवी निवास, राम मंदिरामागे, भूषणनगर, केडगाव), अंबादास मनोहर कदम (प्रोप्रायटर जी. के. इंटरप्राईजेस, एमआर ट्रेड सेंटर, वाडिया पार्क, अहिल्यानगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. देवतरसे व दळवी यांना ताब्यात घेतले असून कदम हा पसार आहे.






