अहमदनगर-दूध भेसळीला आळा घालण्यासाठी आरे डेअरीचे अतिरिक्त मनुष्यबळ अन्न व औषध प्रशासनाला दिले जाईल. त्याच बरोबर दुग्धविकास विभागालाही भेसळविरोधी कारवाईसाठी स्वतंत्र अधिकार देण्याचा प्रस्ताव ठेवणार असल्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी गुरुवारी (ता. १५) स्पष्ट केले. नगरमध्ये पत्रकारांशी बोलताना मंत्री विखे म्हणाले, “श्रीगोंदा तालुक्यात झालेल्या दूधभेसळ विरोधातील कारवाईनंतर सुमारे ६० हजार लिटर दूधउत्पादन कमी झाले. तसेच पारनेर हे दूध भेसळीचे दुसरे मोठे केंद्र आहे.
अन्न व औषध प्रशासनाकडून मनुष्यबळ कमी असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे आरेचे अतिरिक्त ठरलेले मनुष्यबळ अन्न व औषध प्रशासनाला दिले जाईल. जिल्ह्यासह राज्यातील दूध भेसळीला आळा घालणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे अन्न व औषध प्रशासनात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार असल्याच्याही तक्रारी आहेत. या खात्याकडून कायद्याचा धाक दाखवत पैसे उकळण्याचा धंदा काही जणांनी सुरू केला आहे. भेसळीच्या दुधाची स्वीकृती बहुतांश खासगी प्लॅन्टधारकांकडून होते. भेसळ विरोधात कारवाईसाठी आता एफडीए बरोबरच दुग्धविकास विभागालाही स्वतंत्र अधिकार देण्याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळाला देणार आहे.
राज्यात सरकार अस्तित्वात आल्यापासून महाविकास आघाडी सरकारमध्ये भविष्यकारांची संख्या वाढली आहे. त्यांचे भविष्य खरे ठरत नसल्याचे त्यांना शल्य आहे. काही दिवसातच ते त्यांची वज्रमूठ एकमेकांवर उगारतील, असा टोला मंत्री विखे यांनी विरोधकांना लगावला.