नगर: नगर शहरातील बाजारपेठेतील अतिक्रमणे, व्यापारी वर्गावर होणारे हल्ले यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे. या प्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वैयक्तिक लक्ष घालून तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी केली आहे. याबाबत पाठवलेल्या निवेदनात कळमकर यांनी म्हटले आहे की,
अहमदनगर शहर हे शांतता प्रिय व जिल्ह्याची प्रमुख बाजारपेठ असलेले शहर आहे. येथील कापड बाजार संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून बाजारपेठेतील फेरीवाले, हातगाडीवाल्यांची अतिक्रमणे व्यापारी वर्गासाठी डोकेदुखी ठरत आहे. नुकत्याच झालेल्या एका घटनेत समाजकंटकांनी दोन व्यापाऱ्यांवर भरदिवसा चाकूने प्राणघातक हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे संपूर्ण व्यापारी वर्ग भयभीत झाला आहे. व्यापारी वर्गाने उत्स्फूर्त एकत्र येत कडकडीत बंद पाळून निषेध नोंदविला.
परंतु या घटनेने शहरात कायदा व सुव्यवस्थेची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. मागील वर्षभरात अशाच पद्धतीने व्यापाऱ्यांना मारहाण होण्याच्या तीन ते चार घटना घडल्या आहेत. अतिक्रमणांचा प्रश्न सोडविण्यासाठी महानगर पालिका प्रशासन पूर्णतः अपयशी ठरले आहे. दरवेळी थातूरमातूर कारवाई करून वेळ मारून नेली जाते. वास्तविक फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करणे शक्य असताना मनपा प्रशासन मूग गिळून गप्प बसले आहे. पोलिस प्रशासनाकडून अतिक्रमण हटाव मोहिमेसाठी महापालिकेला आवश्यक सहकार्य आणि बंदोबस्त देण्याचे काम केले जाते. पण मनपा आयुक्त कोणाच्या तरी दबावाखाली अतिक्रमणांचा कयमचा बंदोबस्त करण्यासाठी हालचाल करत नाहीत, अशीच परिस्थिती पहायला मिळते आहे. त्याचा थेट परिणाम बाजार पेठेवर होत आहे. कोट्यवधींची गुंतवणूक करून व्यापारी व्यवसाय करतात, परंतु दुकानासमोरील अतिक्रमणांमुळे व्यवसायावर परिणाम होतो आहे. मनपा प्रशासनाकडे दाद मागूनही दखल घेतली जात नाही. त्यामुळे व्यापारी वर्गाला अक्षरशः जीव मुठीत धरून व्यवसाय करावा लागतो आहे. काही अपप्रवृत्ती कोणाच्या तरी वरदहस्तामुळे संपूर्ण शहराला वेठीस धरण्याचा प्रयत्न करीत आहे. अशीच परिस्थिती कायम राहिली तर संपूर्ण बाजार पेठ उध्वस्त होण्याची भीती व्यक्त होत आहे. गृहमंत्री या नात्याने आपण नगर शहरातील गंभीर परिस्थितीकडे गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ कडक उपाययोजना करण्याचे आदेश प्रशासनाला द्यावेत ही विनंती. अन्यथा शहरातील परिस्थिती स्फोटक बनून गंभीर गोष्टी घडू शकतात. राजकारण बाजूला ठेवून शहरात शांतता नांदण्यासाठी उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी आपण तातडीने आदेश जारी करावेत अशी आग्रही मागणी नगरकरांच्या वतीने करण्यात येत आहे.