निवडणूक आयोगाने ‘शिवसेना’ नाव आणि ‘धनुष्यबाण’ पक्षचिन्ह एकनाथ शिंदे गटाला बहाल केलं आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर उद्धव ठाकरे आक्रमक झाले आहेत. निवडणूक आयोगाचा निकाल एकांगी असून आपण तो मानायला तयार नाही, असं विधान उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. शिवाय निवडणूक आयोग बरखास्त करा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
निवडणूक आयोगाच्या निकालावर भाष्य करताना उद्धव ठाकरे म्हणाले, “जेव्हा या वादाला सुरुवात झाली, तेव्हा निवडणूक आयोगानं आम्हाला प्रतिज्ञापत्रं सादर करायला लावली होती. सदस्य संख्या दाखवा, असं सांगितलं होतं. मग मधल्या काळात चार-सहा महिने गेले. दरम्यान, शिवसेनेनं बोगस प्रतिज्ञापत्रं दिली अशा बातम्या आल्या. यानंतर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ठिकठिकाणी जाऊन शपथपत्रे तपासली. त्यामध्ये असत्य असं काहीच नाही, सर्व कागदपत्रे योग्य आहेत, असा अहवाल गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दिला.