शिवसेनेने (ठाकरे गट) महाविकास आघाडी तोडण्याचा घेतलेला निर्णय, हा आदित्य ठाकरे यांच्या वैयक्तिक फायद्यासाठी घेण्यात आला आहे, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ‘एक्स’ सोशल मीडियावर ट्वीटद्वारे केला आहे.
मुंबईपासून नागपूरपर्यंत आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार आहोत. आता काय होईल ते होईल. आम्हाला एकदा स्वबळ आजमावून पाहायचंच आहे, असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जाहीर केलं. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये ठाकरे स्वबळावर लढणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.https://x.com/Prksh_Ambedkar/status/1877981761583317273
जागावाटपात बराच उशीर झाल्यामुळे विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा पराभव झाला, असं वक्तव्य काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलं होतं. जागावाटपात झालेल्या घोळास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत जबाबदार असल्याचा त्यांचा रोख होता. त्यावर भाष्य करताना संजय राऊत यांनी स्वबळाचे दंड थोपटले. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांना संधी मिळाली नाही. याचा फटका पक्षाच्या वाढीला बसतो. महापालिका, जिल्हा परिषदा, ग्राम पंचायत निवडणुका आम्ही स्वतंत्र लढणार आहोत. आपालले पक्ष मजबूत करणार आहोत’ असं संजय राऊत शनिवारी सकाळी पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले.






