आताच्या काळात राजकारण म्हणजे फक्त सत्ताकारण बनले आहे. प्रतिस्पर्ध्यावर कुरघोडी करणे, सत्ता कशी मिळेल यासाठी विचारधारेला मूठमाती देणे असे प्रकार वाढले आहेत. अशा या वातावरणात नगर शहराचे माजी आमदार दादाभाऊ कळमकर म्हणजे सज्जन, अजातशत्रू व अत्यंत निस्वार्थी राजकारणी म्हणून ओळखले जातात. त्यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त (दि.5 जानेवारी 2025) आज त्यांच्या घरी जावून त्यांचे अभिष्टचिंतन केल व पाया पडलो. कारण आजच्या काळात राजकारणात तरी इतक्या स्वच्छ पायाचे व्यक्तिमत्त्व शोधूनही सापडणार नाही अशी परिस्थिती आहे…
एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या दादाभाऊंचा जीवन प्रवास, त्यांची राजकीय, सामाजिक कारकिर्द राजकारणात नव्याने येवू इच्छिणाऱ्या तसेच सध्या राजकारणात असलेल्या प्रत्येकासाठी आदर्शवत व दीपस्तंभासारखी दिशादर्शक आहे. राजकारण करताना विरोधकांनाही आपल्या सौजन्यशील स्वभावाने आपलेसे कसे करावे याच मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आदरणीय दादाभाऊ कळमकर. सन 1985 मध्ये दादाभाऊ नगर शहर विधानसभा निवडणूक लढवत होते. त्याचवेळी अतिशय तरूण वयात मी सुध्दा राजकारणाचा श्रीगणेशा त्यांच्याच नेतृत्वाखाली केला. तेव्हापासून आजपर्यंत मी कायम दादाभाऊंबरोबर आहे. त्यांच्या सहवासात माझ्यासारख्या कार्यकर्त्याला अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. त्यांची एक गोष्ट खूप भावते ती म्हणजे कोणाबद्दलही मनात कटूता ठेवायची नाही. निवडणुकीत एखाद्याने विरोधात काम केले असेल पण दुसऱ्यादिवशी ती व्यक्ती काम घेवून आली तर त्याला नाही न म्हणता त्याचे काम करून द्यायचे असा दिलदारपणा त्यांच्यात आहे. सध्याच्या राजकारणात अशी वृत्ती दुर्मिळ झाली आहे. प्रत्येक पदाधिकारी, कार्यकर्ता हा आपापल्या पक्षाच्या विचारधारेनुसार, नेत्याच्या विचारांनुसार काम करीत असतो. अशावेळी त्याला दुष्मन न समजता विचारांची लढाई विचारांनीच लढणे महत्वाचे आहे. दुर्देवाने प्रचलित राजकारणात हे चित्र पहायला मिळत नाही. विचारांची वाणवा असल्याने गुंडांचे राजकारणात प्रस्थ वाढले आहे. हे थांबवायचे तर दादाभाऊंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला पाहिजे.
1991 ला मी तत्कालिन नगरपालिकेत प्रथमच नगरसेवक म्हणून निवडून आला. दादाभाऊ सुध्दा त्यावेळी ज्येष्ठ नगरसेवक म्हणून सभागृहात होते. सभागृहात लोकांचे प्रश्न कसे मांडायचे, कोणते मुद्दे ठळक पणे मांडायचे याची शिकवण मला त्यांच्याकडून मिळाली. सर्वात महत्वाचे म्हणजे अधिकाऱ्यांशी नेहमी सौजन्याने वागून जनहिताची कामे मार्गी लावायची हे त्यांनी शिकवले. अधिकारी काम करतात, त्यांच्याशी नेहमी सोजन्याने वागा हा त्यांचा सल्ला व शिकवण मला आज नगरसेवक नसतानाही उपयोगी पडते. माझे जनहिताचे काम अधिकारी कधीच अडवत नाहीत. दादांचे नेहमीच एक सांगणे असते, तुम्ही समाजकारण, राजकारण करताना गोरगरीब, तळागाळातील लोकांचा प्रथम विचार केला पाहिजे. त्यामुळेच सन 1992 मध्ये त्यांनी मला नगर शहर हॉकर्स युनियनची स्थापना करून त्याचा अध्यक्ष केले. आजही मी या युनियनचा अध्यक्ष आहे. या माध्यमातून रस्त्यावरील भाजीविक्रेते, हातगाडीवाले यांचे संघटन करून त्यांचे प्रश्न सोडविणे, त्यांच्या मुलाबाळांच्या शिक्षणासाठी पाठबळ देणे, विविध शासकीय योजनांचा लाभ त्यांना मिळवून देणे अशा कामातून लाखमोलाचे आशीर्वाद मिळतात.
दादाभाऊंसारखे राजकीय गुरू लाभणे हे खरोखरच माझे भाग्य आहे. त्यांनी केलेल्या राजकीय संस्कारांचे, समाजकारणाच संस्कारांचे उपकार मी कधीच विसरणार नाही. अशा व्यक्ति राजकारणात दुर्मिळ झाल्या आहेत. त्यांच्या विचारांची समाजाला, आताच्या राजकारणाला खूप गरज आहे. दादाभाऊ जरी आज 80 वर्षांचे झाले असले तरी त्यांचे विचार चिरतरूण आहेत. माजी महापौर अभिषेक कळमकर हे त्यांचा हाच विचारांचा वारसा पुढे चालवत आहेत. याचा विशेष आनंद होतो. आदरणीय दादाभाऊंना उदंड निरोगी आयुष्य लाभो हीच आई तुळजाभवानी चरण प्रार्थना व त्यांना वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा।
– संजय झिंजे
माजी नगरसेवक,
अध्यक्ष, नगर शहर हॉकर्स युनियन






