पंचांशी हुज्जत घालणं भोवलं; शिवराज राक्षे, महेंद्र गायकवाडवर कुस्तीगीर परिषदेची मोठी कारवाई

0
43

अहिल्यानगरमध्ये रविवारी (२ फेब्रुवारी) महाराष्ट्र केसरी स्पर्धेची उपांत्य व अंतिम फेरी पार पडली. मात्र, ही स्पर्धा वादग्रस्त ठरल्याचे पाहायला मिळाले. डबल महाराष्ट्र केसरी असलेल्या शिवराज राक्षे याने पंचांनी चुकीचा निर्णय दिल्याचा दावा करत रागाच्या भरात पंचांना लाथ मारली. त्यानंतर अंतिम सामन्यामध्ये महेंद्र गायकवाड आणि पृथ्वीराज मोहोळ यांच्यात काँटे की टक्कर पाहायला मिळाली. शेवटच्या मिनिटामध्ये मोहोळला एक गुण दिल्याने त्यावर महेंद्रने आक्षेप घेतला, शेवटी त्याने १६ सेकंद बाकी असताना मैदान सोडले. त्यामुळे पंचांच्या निर्णयाला डावलून त्याने मैदान सोडल्याने महेंद्र आणि शिवराज राक्षे या दोघांवर कारवाई करण्याचा निर्णय कुस्तीगीर परिषदेने घेतला आहे.

उपांत्य फेरीमध्ये गादी विभागाच्या अंतिम फेरीमध्ये शिवराज राक्षे आणि पृथ्वीराज मोहोळ यांच्यात लढत झाली होती. मोहोळने टाकलेल्या ढाक डावाने शिवराज खाली पडला पण त्याची पूर्ण पाठ न टेकलेली नसताना पंचांनी मोहोळला विजयी केले. त्यामुळे संतापलेल्या राक्षेने पंचाची कॉलर ओढली आणि लाथ मारली. त्यामुळे वाद झाला. यानंतर अर्ध्या तासाने स्पर्धेचा अंतिम सामना खेळवण्यात आला. या सामन्यात महेंद्र गायकवाड व पृथ्वीराज मोहोळ आमने सामने होते. मात्र हाफ टाइममध्ये महेंद्रने पंचाशी वाद घालायला सुरुवात केली. त्याने पंचांना शिवीगाळ केल्याचा दावा केला जात आहे. त्यापाठोपाठ महेंद्रने थेट मैदान सोडलं. त्यामुळे पंचांनी पृथ्वीराज मोहोळ याला विजयी घोषित केले. यानंतर शिवराज राक्षे व महेंद्र गायकवाड या दोन्ही पैलवानांच्या गैरवर्तनाची दखल घेऊन कुस्तीगीर परिषदेने या दोघांना तीन वर्षासाठी निलंबित केले आहे.

दरम्यान, तशी माहिती महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष रामदास तडस यांनी माध्यमांशी बोलतांना दिली. ते म्हणाले की, पंचांनी दिलेला निर्णय बरोबर होता. खेळाडूंनी खिलाडूवृत्तीने खेळायला हवे. पंचांना लाथ मारणे, शिवीगाळ करणे हे एका खेळाडूला शोभत नाही, त्यामुळे आम्ही निर्णय घेतला. शिवराज राक्षेला या स्पर्धेतून तीन वर्षांसाठी निलंबित करण्यात येत आहे. त्यामुळे त्याला कुठेही खेळता येणार नाही. महेंद्र गायकवाडने (Mahendra Gaikwad) कुस्ती खेळत असताना हाफ टाईममध्ये पंचांसोबत वाद घातला, शिवीगाळ केली. आमच्या कार्याध्यक्षांवर सुद्धा अरेरावीची भाषा वापरली. हे एका खेळाडूला न शोभणारे आहे, त्यामुळे दोघांना तीन वर्षांसाठी निलंबित करण्यात आल्याचे रामदास तडस यांनी सांगितले.