अभिरुप न्यायालय सारख्या स्पर्धा विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी उपयुक्त

0
74

अभिरुप न्यायालय सारख्या स्पर्धा विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी उपयुक्त

डॉ.संभाजी पठारे यांचे प्रतिपादन, यशस्वी विद्यार्थ्यांचा केला सन्मान

नगर, दि. २८ प्रतिनिधी : ‘अभिरुप न्यायालय सारख्या स्पर्धा विधी अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खूपच महत्त्वाच्या आहेत. अशा स्पर्धांच्या माध्यमातून न्यायालयाचे कामकाज कशा पद्धतीने चालते, हे विद्यार्थ्यांना समजण्यास मदत होते. याशिवाय या स्पर्धांमधील सहभाग हा विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी खूपच उपयुक्त असतो,’ असे प्रतिपादन साकेश्वर ग्रामीण विकास सेवा संस्थेच्या संगणक व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ.संभाजी पठारे यांनी केले.

साकेश्वर ग्रामीण विकास सेवा संस्थेच्या अडसूळ लॉ कॉलेजचे विद्यार्थी सिद्धेश रोडे, शुभांगी जमदाडे, चैताली मते, आशिष कावट यांनी नुकताच न्यू लॉ कॉलेजमध्ये झालेल्या दिवंगत माजी न्यायाधीश एस.बी.म्हसे राज्यस्तरीय अभिरुप न्यायालय स्पर्धेत सहभागी होत उत्कृष्ट कामगिरी केली. यासर्व विद्यार्थ्यांचा सन्मान अडसूळ लॉ कॉलेजमध्ये डॉ.संभाजी पठारे यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी स्पर्धेमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे साकेश्वर ग्रामीण विकास सेवा संस्थेचे चेअरमन अनिरुद्ध अडसूळ, संस्थेच्या सचिव लीना अडसूळ, संस्थेचे संचालक कृष्णा अडसूळ, संस्थेच्या अडसूळ टेक्निकल कॅम्पसचे संचालक डॉ. प्रदीप पाटील, पॉलिटेक्निकचे प्राचार्य रमेश गडाख यांनी अभिनंदन केले. तर, यशस्वी विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य रियाज बेग, प्रा. क्रांती बागुल, प्रा.श्रृती पाखरे, प्रा.प्रदीप गायकवाड यांचे मार्गदर्शन मिळाले.

‘अभिरुप न्यायालय स्पर्धेत विविध विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी सहभागी होतात. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये विचारांची देवाण-घेवाण होते,’ असेही डॉ.पठारे यांनी सांगितले. तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये विविध पदावर काम करताना आलेले अनुभव देखील डॉ. पठारे यांनी विद्यार्थ्यांना सांगताना त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य रियाज बेग यांनी केले. स्वागत प्रा.क्रांती बागुल यांनी करून आभार प्रा.श्रृती पाखरे यांनी मानले.