महापालिका मुख्यालयाच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारल्याने जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान गुरूवारी सकाळी मृत्यू झाला. गणेश ठमाजी राहिंज (रा. वांबोरी ता. राहुरी) असे त्याचे नाव आहे. बुधवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली होती. तोफखाना पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
बुधवारी दुपारी राहिंज हा मनपाच्या मुख्य कार्यालयात आला होता. मात्र, कोणत्याही विभागाच्या कार्यालयात न जाता पहिल्या मजल्यावरील पॅसेजमध्ये जाऊन संगणक विभागाच्या कार्यालयासमोरील मोकळ्या जागेतून खाली असलेल्या पाणीपुरवठा विभागाच्या कार्यालयासमोर त्याने उडी मारली. त्याला उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. गुरूवारी त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, राहींज हा मनपात कशासाठी व कोणाकडे आला होता, त्याने उडी का मारली, याचे कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही.






