अहमदनगर -आठरे पाटील बालगृहाच्या आवारात उघड्या व जीर्ण झालेल्या वीजेच्या तारेचा शॉक लागूनच आठ वर्षीय बालक साईराज गणेश बावरे याचा 20 मे रोजी सकाळी मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. त्याच्या मृत्यूस जबाबदार धरून आठरे पाटील ग्राम नवोदय ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. अनिल आठरे, बालगृहाचे अधीक्षक पुष्पाजंली बाळासाहेब थोरात (रा. रेणुकामाता मंदिरासमोर एमआयडीसी) यांच्याविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत साईराजची आई भक्ती गणेश बावरे (वय 28 रा. गणेश चौक, बोल्हेगाव फाटा) यांनी 22 मे रोजी सायंकाळी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी चौकशी केली असता ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. आठरे, बालगृहाचे अधीक्षक थोरात यांच्या निष्काळजीपणे व हयगयीने बालगृहातील इमारतीच्या वीजेच्या तारेचे देखभाल न ठेवता सदर इमारतीच्या बाहेरील बाजुस वीजेची जीर्ण झालेली तार निष्काळजीपणे उघडी व चालू अवस्थेत ठेवली. त्या तारेला साईराजचा हात लागून त्याला शॉक बसला व त्यात त्याचा मृत्यू झाला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस अंमलदार परदेशी अधिक तपास करत आहेत.