नगर शहरात गोरगरीब नागरिकांना धमकावून, बनावट कागदपत्रांच्या आधारे खरेदी करून, अधिकाऱी व पोलिसांच्या संगनमताने कोट्यवधी रूपये किंमतीच्या जागा बळकवण्याच्या घटना घडत असल्याच्या विरोधात काल (शुक्रवारी) राष्ट्रवादीचे आमदार प्राजक्त तनपुरे व आमदार निलेश लंके, शिवसेना ठाकरे गटातील पदाधिकार्यांनी पीडित नागरिकांसह जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.
दरम्यान, बेकायदा जागा बळकवल्याची तक्रार असलेल्या नागरिकांची यादी सादर करा, प्रत्येक प्रकरणाची स्वतंत्र व सखोल चौकशी केली जाईल असे आश्वासन जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांनी मोर्चा काढणार्यांना दिले. यावेळी अनेक पिढीत नागरिकांनी कागदपत्रांसह कैफियत मांडली. ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, युवा सेनेची सहसचिव विक्रम राठोड, उपजिल्हाप्रमुख भगवान फुलसौंदर, गिरीश जाधव, माजी महापौर अभिषेक कळमकर, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, योगीराज गाडे, अमोल येवले, अशोक दहिफळे, संजय आव्हाड, राजेंद्र भगत, अक्षय नागपुरे तसेच शिंदे गटाचे शहर प्रमुख दिलीप सातपुते आदींच्या शिष्टमंडळाने चौकशीच्या व दोषी अधिकार्यांवर कारवाईच्या मागणीची निवेदन जिल्हाधिकार्यांना दिले. लोकप्रतिनिधींचे नातेवाईक व कार्यकर्ते यामध्ये सहभागी असल्याचा गंभीर आरोपही निवेदनात करण्यात आला. गोरगरीब नागरिकांच्या जागा बळकविण्याचा प्रकार गंभीर असल्याचे आ. तनपुरे यांनी सांगितले. अशा स्वरूपाच्या तक्रारीसाठी स्वतंत्र कक्ष तयार करावा तसेच चौकशीसाठी स्वतंत्र अधिकारी नियुक्त करावा, या पोलीस व महसूल विभागाचे अधिकारी यामध्ये सहभागी आहेत, त्यांच्यावरही कारवाई करावी अशी मागणी आ. लंके यांनी केली. नगर शहरातून अशा स्वरूपाच्या कमी किमान 40 ते 50 तक्रारी प्राप्त झाल्याचे विक्रम राठोड यांनी सांगितले.