संजय राऊत यांच्या या इशाऱ्यानंतर मातोश्रीवर तातडीची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला ठाकरे गटाचे नाशिकमधील विजय काळसकर आणि विलास शिंदे हे पदाधिकारीही उपस्थित आहेत. ही बैठक सुरु असतानाच मातोश्रीवर नाशिक पदवी मतदारसंघातील अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील या दाखल झाल्या आहेत. त्यामुळे आता ठाकरे गटासह संपूर्ण महाविकास आघाडीकडून नाशिक पदवीधर निवडणुकीत आपली संपूर्ण ताकद शुभांगी पाटील यांच्या पाठिशी उभी करण्याची शक्यता आहे. काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही आम्ही सत्यजीत तांबे यांना पाठिंबा देणार नाही, आम्ही अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देऊ, असे म्हटले होते. त्यामुळे आता महाविकास आघाडीचे नेते नाशिकमध्ये सत्यजीत तांबे यांचा करेक्ट कार्यक्रम करण्याच्या तयारीला लागल्याचे दिसत आहे.