नगर : नगर शहरात गुरूवारी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी झाली. मात्र संध्याकाळी भिंगार, आशा टॉकीज चौक, तेलीखुंट परिसरात मिरवणुकीला गालबोट लागले. दोन्ही बाजूंनी दगडफेकीचे प्रकार घडले. याप्रकरणी चार स्वतंत्र फिर्यादी दाखल झाल्या आहेत.
सहाय्यक फौजदार राजेंद्र गर्जे यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे. नगर शहरातील तेलीखुंट परिसरात आंबेडकर जयंतीची मिरवणूक सुरु होती. त्यावेळी एक जमाव मोठ्या संख्येने तेथे घोषणाबाजी देत आला. या जमावाने मिरवणुकीवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. त्यावेळी बंदोबस्तावर असलेले पोलिस कर्मचारीही जखमी झाले. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून तेथे अतिरिक्त बंदोबस्त बोलावण्यात आला. तसेच तेथे उपस्थित असलेल्या पोलिस कर्मचार्यांनी दगडफेक करणार्या तरुणांना पाठलाग करुन ताब्यात घेतले. या घटनेत सहा पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. यांसदर्भात १३ जणांसह ५० ते ६० जणांविरोधात पोलिसांनी ३०८, ३५३, ३३२, ३३३ यांसह विविध कलमांन्वये कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
दुसरी फिर्याद पोलिस कर्मचारी उमेश शेरकर यांनी दाखल केली आहे. ते आशा टॉकीज येथे आंबेडकर जयंती मिरवणुकीसाठी बंदोबस्तावर होते. त्यावेळी तख्ती दरवाजा येथे आंबेडकर जयंतीची मिरवणूक सुरु होती. त्यावेळी मिलिंद तरुण मंडळाची मिरवणूक सुरु होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घोषणा देण्याचे सोडून तेथे दोन समाजामध्ये तेढ निर्माण होतील अशा मोठ्याने घोषणाबाजी सुरु केली. त्यावेळी प्रत्युत्तर म्हणून एका गटातील २० ते २५ तरुणांनी घोषणाबाजी करण्यात सुरुवात केली. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये म्हणून पोलिसांनी बळाचा वापर केला.