अहमदनगर- मंदिर परिसरात साचलेले पावसाचे पाणी काढण्याचा प्रयत्न करत असताना जवळच असलेल्या विजेच्या खांबाला स्पर्श झाल्याने विजेचा धक्का बसून 27 वर्षिय युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि.5) पहाटे 1.30 च्या सुमारास सावेडी उपनगरातील श्रमिक बालाजी मंदिर परिसरात घडली. संकेत राजेंद्र झुंजुर (वय 27, रा.श्रमिक बालाजी मंदिराजवळ, नगर) असे या मयत युवकाचे नाव आहे. गुरुवारी (दि.4) मध्यरात्री शहर परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने सखल भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. श्रमिक बालाजी मंदिर परिसरातही पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचल्याने काही युवक ते पाणी काढून देण्याचा प्रयत्न करत होते. त्यामध्ये संकेत झुंजूरचाही समावेश होता. पाणी काढून देण्याच्या प्रयत्नात असताना तो पाय घसरून पडला व जवळच असलेल्या विजेच्या खांबाला त्याचा स्पर्श झाला. त्यावेळी विजेच्या खांबात विद्युत प्रवाह उतरलेला होता. त्यामुळे संकेतला विजेचा जोरदार धक्का बसून त्याचा जागीच मृत्यू झाला. सकाळी जिल्हा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन केल्यावर दुपारी नालेगाव अमरधाम स्मशानभूमीत त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मयत संकेत हा अविवाहित होता. त्याच्या पश्चात वृद्ध आई आहे. त्याच्या दुर्दैवी मृत्युने श्रमीकनगर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.