नगर शहरातील विकासकामे रखडणार… नव्या सरकारने कोट्यावधींच्या निधीला दिली स्थगिती

0
601

शहर खड्ड्यांमध्ये हरवले असताना नव्या सरकारने रु. २ कोटींच्या कामांना दिलेल्या स्थगितीचा काँग्रेसच्यावतीने निषेध ;

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना स्थगिती उठविण्याच्या मागणीसाठी पत्र पाठवणार – किरण काळे

प्रतिनिधी : सत्ता येत, जात असते. माञ सत्तेचा दुरुपयोग विकास कामांत अडथळा आणण्यासाठी करणे चुकीचे आहे. तत्कालीन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यामुळे आणि शहर काँग्रेसच्या पाठपुराव्यामुळे रू. २ कोटींचा निधी आम्ही मंजूर करून आणला होता. शहराच्या राजकारणात आज काँग्रेस सत्तेपासून दूर असली तरी देखील पहिल्यांदाच अशा प्रकारचा निधी आम्ही मंजूर करून आणला होता. शहर खड्ड्यांमध्ये हरवले असताना नव्या सरकारने काँग्रेसने आणलेल्या रु. २ कोटींच्या कामांना दिलेल्या स्थगितीचा सामान्य नगरकर जनतेच्या वतीने काँग्रेस निषेध करीत असल्याचे, शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी म्हटले आहे.

या निधी मंजुरीसाठी किरण काळे यांनी आ.थोरात यांच्या माध्यमातून महाविकास आघाडी शासनाकडे पाठपुरावा केला होता. यामध्ये सावेडी, केडगावसह शहराच्या विविध भागांतील रस्ते, सीसीटिव्ही, वॉल कंपाऊड, पेव्हिंग ब्लॉक टाकणे, मंदिरांची कामे मंजूर करण्यात आली होती. मुकूंदनगर सारख्या दुर्लक्षित अल्पसंख्याक बहुल भागासाठी रू. ७६ लाखांची विशेष मंजूरी काँग्रेसने घेतली होती. यामध्ये रस्त्यांच्या कामांवर विशेष भर देण्यात आला होता. त्याचबरोबर नागरिकांच्या सोयीसाठी सुमारे दोनशे बाकड्यांसाठी निधी मंजूर करण्यात आला होता.

काळे म्हणाले की, ३० मार्च २०२२ रोजी या कामांच्या मंजुरीचा शासन निर्णय झाला होता. शहरातील विकास कामे मार्गी लागावीत यासाठी नगर विकास खात्याकडे माजी मंत्री आ.थोरात यांच्यामार्फत आम्ही सातत्याने पाठपुरावा केला होता. नगर विकास विभागाने त्यावेळी काढलेल्या शासन निर्णयाला स्वतःच नवीन शासन निर्णय काढत दिलेली स्थगिती ही आश्चर्यकारक आहे. ही स्थगिती का दिली आहे याचे कारण त्यांनी जाहीर केलेले नाही. मात्र एक सरकार जाते, दुसरे सरकार येते आणि आलेले नवीन सरकार विकास कामांना आडकाठी आणते. रस्त्यांची दैनावस्था झालेली असताना हा नगरकरांवर नव्या शासनाने राजकीय सूड उगारला आहे की काय, असा संतप्त सवाल काळे यांनी केला आहे.

शहाराचा सर्वांगीण विकास हेच काँग्रेसचे ध्येय आहे. माञ विकास कामांना स्थागिती दिल्याबद्दल नव्या सरकारचा मी नगरकरांच्या वतीने निषेध करतो. सदर विकासकामांना, विशेषतः रस्त्यांच्या कामांना दिलेली स्थगिती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना ही तात्काळ उठवावी यासाठी लेखी पत्र मी पाठविणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष काळे यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे.