नगर -सायबर पोलिसांनी फिर्याद न घेतल्याच्या रागातून एका महिलेने जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या इमारतीमधील पहिल्या मजल्यावरून उडी मारण्याचा प्रयत्न केला. दरम्यान आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी सदर महिलेविरोधात भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ती महिला श्रीगोंदा तालुक्यातील आहे.
बुधवारी दुपारी सदर महिला पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये सायबर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आली होती. तिचा फोटो एका व्यक्तीने सोशल मीडियावर व्हायरल केला असल्याची तिची तक्रार होती. यासंदर्भात तक्रार देण्यासाठी ती महिला आधी बेलवंडी पोलीस ठाण्यात गेली होती. त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात जाण्यास सांगितले. त्यामुळे ती महिला सायबर पोलीस ठाण्यात गेली होती.
मात्र, सायबर पोलिसांनी तुमची तक्रार आमच्या पोलीस ठाण्याअंतर्गत येत नाही, असे सांगितल्याने चिडलेल्या महिलेने पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या पाहिल्या मजल्यावरून उडी मारण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.