प्रतिनिधी : सोमवारी मध्यरात्री शहर झोपेत असताना रस्त्यावर नंग्या तलवारी नाचवल्या गेल्या. पूर्वनियोजित कट करत मारेकऱ्यांचा तिहेरी हत्याकांड घडवण्याचा डाव होता. एकाची हत्या करण्यात मारेकरी यशस्वी झाले. दुसऱ्याला जखमी केले. अन्य अंधारात लपून बसले. म्हणून त्यांचा जीव वाचला. या घटनेचा मास्टर माईंड बडं राजकिय प्रस्थ आहे. यापूर्वी देखील शहरात दुहेरी हत्याकांड घडले आहे. यावेळी मात्र हिंदुत्वाचे काम करणाऱ्या युवकांना यम सदनी धाडून तिहेरी हत्याकांडाचा डाव होता, असा घाणाघाती आरोप शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केला आहे.
काँग्रेसच्या शिवनेरी पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी संजय झिंजे, दशरथ शिंदे, अनिस चूडीवाला, रतिलाल भंडारी, मनसुख संचेती, विलास उबाळे, गणेश चव्हाण, प्रशांत जाधव, ॲड. अक्षय कुलट, आकाश आल्हाट, गंगाधर जवंजाळ, प्रणव मकासरे, विकास भिंगारदिवे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी काळे यांनी अनेक गंभीर आरोप केले. काळे म्हणाले घडलेल्या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या ताब्यात आहे. अवैद्य धंद्यांची तक्रार दिली या रागातून घटना घडल्याची फिर्याद फिर्यादीने दिली आहे. वास्तविक पाहता कोतवालीच्या हद्दीमध्ये मारेकर्यांचे अवैद्य धंदे सुरू होते. शहरात अवैध धंदे बोकाळले आहेत. या धंद्यांना शहराच्या मोठ्या नेत्याचा वरदहस्त आहे. आपण दुहेरी हत्याकांड, एसपी ऑफिस हल्ला जिरवू शकतो. तर आपण काहीही जिरवू शकतो असा त्यांचा समज झाला आहे. त्यातूनच दहशत निर्माण केली जात आहे. यातून शहरातील तरुणाई समोर गुन्हेगारीचा आदर्श निर्माण केला जात असून हे शहरासाठी चिंताजनक आहे.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर युवकांमध्ये दहशत निर्माण केली जात आहे. राजकीय वरदहस्तातून गुन्हेगारी कृत्य करणाऱ्या राजकीय कार्यकर्त्यांनी नगर शहराचा बिहार केला आहे. शहरात कायदा सुव्यवस्था संपुष्टात आलेली आहे. शहर हे जिल्ह्याचे मुख्यालय असून स्वतः जिल्हा पोलीस अधीक्षकांच कार्यालय या शहरात असून देखील हत्याकांड होत. ही पोलिसांसाठी शरमेची बाब आहे. असं असेल तर पोलिसांनी पोलीस स्टेशन बंद करावीत. नागरिकांना स्वसंरक्षणासाठी हत्यारं कायदेशीर परवाने देत द्यावीत. अशी मागणी यावेळी काळे यांनी सरकारकडे केली आहे. घडलेल्या परिसरातील नागरिकांमध्ये तसेच या रस्त्यावर मोठ्या संख्येने स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे व महाविद्यालयीन शिक्षण घेणारे विद्यार्थी, विद्यार्थिनी यांच्यामध्ये दहशत निर्माण झाली आहे. जवळच महाविद्यालय असून त्या ठिकाणी देखील भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
घटना घडण्यापूर्वी आणि घटना घडल्यानंतर मारेकरी कुणाकुणाच्या संपर्कात होते. याची चौकशी झाली पाहिजे. ते ज्यांच्या संपर्कात होते त्यांच्याबरोबर कोणता मोठा राजकीय नेता होता आणि कोणत्या राजकीय नेत्याच्या सांगण्यावरून हे कृत्य घडले याचा सखोल तपास दबाव विरहित झाला पाहिजे. एसपी ऑफिस हल्ला प्रकरणातील आरोपी आजही मोकाटपणे उजळ माथ्याने फिरत आहेत. राजरोसपणे दहशत करत आहेत. त्यामुळे अशा पद्धतीने हत्याकांड करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले पाहिजे. आरोपींना पळून जाण्यामध्ये देखील राजकीय मदत करण्यात आली आहे. हे आरोपी शहरातील एका मोठ्या नेत्याच्या सोयऱ्याच्या मदतीने लपून बसले असल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे. त्याचा सखोल तपास करण्याची आणि आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी काळे यांनी केली आहे.
हत्याकांडामुळे व्यापारी, महिला वर्गात दहशतीचे वातावरण आहे. शहरात आसपासच्या परिसरातून येणारे ग्राहक यामुळे शहरात न येण्याला पसंती देत आहेत. यामुळे शहराचा अर्थकारण उध्वस्त होत असून बाजारपेठ उध्वस्त होत आहे.