अहमदनगर गोळ्या घालून ‘त्याचा’ गामा भागानगरे करू; काँग्रेस पदाधिकार्‍याला धमकी

0
48

अहमदनगर-अवैध धंद्याची तक्रार करत असल्याने गोळ्या घालून त्याचा गामा भागानगरे करू, अशी धमकी काँग्रेस पदाधिकारी संजय रत्नाक झिंजे यांना देण्यात आली आहे. तसेच त्यांच्या चितळे रस्त्यावरील ज्यूस सेंटरवर जाऊन पुतण्या, भाऊ व ग्राहकांना शिवीगाळ करत दमदाटी केली. सदरचा प्रकार गुरूवारी (दि. 20) रात्री 11 वाजता घडला असून यासंदर्भात रविवारी (दि. 23) तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

संजय झिंजे यांचे पुतणे शुभम अजय झिंजे (वय 29 रा. बागरोजा, हाडको, दिल्लीगेट) यांनी फिर्याद दिली आहे. दिलेल्या फिर्यादीवरून अर्जुन नरसिंह जज्जर (रा. भराड गल्ली, तोफखाना), सुरज सुभाष जाधव (रा. रभाजीनगर, केडगाव), ऋषिकेश डहाळे (रा. तेलीखुंट) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय झिंजे यांनी सुमारे सहा महिन्यांपूर्वी अवैध धंद्यासंदर्भात तोफखाना पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज केला होता. त्यावेळी त्यांना सुरज जाधवसह सात जणांनी मारहाण केली होती. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून सुरज जाधवसह सात जण संजय झिंजे यांना वारंवार त्रास देत होते.
गुरूवारी रात्री 11 वाजता फिर्यादी शुभम, त्यांचा भाऊ अनिकेत व वडिल अजय त्यांच्या चितळे रस्त्यावरील ज्यूस सेंटरवर होते. त्यावेळी तेथे अर्जुन जज्जर, सुरज जाधव व ऋषीकेश हाडाळे तेथे आले. त्यांनी ग्राहकांना शिवीगाळ, दमदाटी करत यापुढे येथे यायचे नाही असा दम भरला. सुरज याने संजय झिंजे यांचे नाव घेत त्यांना शिवीगाळ केले. गोळ्या घालून त्याचा गामा भागानगरे आज करू, असे म्हणून मोठमोठ्याने दमदाटी करू लागले. दरम्यान, शुभम झिंजे यांनी पोलिसांना फोन केला. पोलिसही घटनास्थळी आले. त्यानंतरही तिघे घोषणाबाजी करू लागले. याने आमचे अवैध धंदे बंद केले, त्याच्या हॉटेलवरही गुन्हा दाखल करा, असे म्हणून फिर्यादी शुभम, त्यांचा भाऊ, वडिल व ग्राहकांना शिवीगाळ करत धमकी दिली. सदरची घटना घडल्यानंतर शुभम यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे अर्ज दाखल केला होता. त्यानंतर रविवारी तोफखाना पोलीस ठाण्यात तिघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.