नगर शहरात तरूणाला बेदम मारहाण, गून्हा दाखल..

0
31

नगर-घरातील गॅस सिलेंडर पेटविण्याचा प्रयत्न करणार्‍याला विरोध करण्यासाठी गेलेल्या तरूणाला दगडाने मारहाण करण्यात आली. बोल्हेगाव उपनगरातील रेणुकानगरमध्ये रविवारी (दि. 23) रात्री 11 वाजता ही घटना घडली. मारहाणीत अर्जुन खंडु पाचारणे (वय 28 रा. रेणुकानगर, बोल्हेगाव) हे जखमी झाले आहेत.त्यांनी सोमवारी (दि. 24) तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून मनोज रामभजन दिवाकर (रा. रेणुकानगर, बोल्हेगाव) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिवाकर हा दारू पिऊन रेणुकानगर परिसरात राहणार्‍या लोकांना नेहमी शिवीगाळ, दमदाटी करत असतो. रविवारी रात्री 11 वाजता तो दारू पिऊन परिसरातील लोकांना शिवीगाळ करत होता. त्याने त्याच्या घराचे गेट तोडून आत गेला व घरातील गॅस सिलेंडर बाहेर आणले. ते पेटवुन देण्याचा प्रयत्न करत असताना पाचारणे तेथे गेले.

त्याला राग आल्याने त्याने पाचारणे यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. डोक्यात दगड फेकून मारून जखमी केले. तेथे आलेल्या इतरांना देखील दिवाकर याने शिवीगाळ करून परिसरात दहशत निर्माण केली आहे. जखमी पाचारणे यांनी रूग्णालयात उपचार घेतल्यानंतर सोमवारी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.